|| प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर स्वरूप धारण करीत असल्याचे चित्र आहे. पश्चिम विदर्भातील आत्महत्याग्रस्त पाच जिल्हय़ांमध्ये वर्षभरात १२०६ शेतकऱ्यांनी जीवन संपवले. २०२० वर्षांत गत १४ वर्षांतील सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडल्या आहेत. २००६ मध्ये सर्वात जास्त १२९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. त्यानंतर २०२० हे वर्ष शेतकऱ्यांसाठी अत्यंत घातक ठरले. विदर्भातील शेतकऱ्यांभोवतीचा आत्महत्येचा फास कायम असून, त्या रोखण्यात सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरले आहेत.

gaza hunger
Israel-Gaza War: गाझातील लक्षावधी लोकांवर उपासमारीची वेळ; या परिस्थितीला कारणीभूत कोण?
99 fights among psychiatric patients in three years in Nagpur
नागपूर: मनोरुग्णांमध्ये तीन वर्षांत ९९ वेळा हाणामारी
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम
Gadchiroli district is worst affected by wildfires
जागतिक वनदिन विशेष: वणव्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याची सर्वाधिक होरपळ 

विदर्भाला दोन दशकांपूर्वी लागलेला शेतकरी आत्महत्येचा कलंक अद्यापही पुसला गेलेला नाही. विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम व वर्धा या सहा जिल्ह्य़ांमध्ये २००१ पासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक उपाययोजना व अभियान राबविण्यात आले. मात्र, २० वर्षांपूर्वी सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे दुष्टचक्र अद्यापही संपलेले नाही. गत दोन दशकांत पश्चिम विदर्भातील एकूण १६४६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विदर्भामध्ये शेतकऱ्यांची विदारक परिस्थिती आजही कायमच आहे. आर्थिक विवंचना, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा, शासकीय योजनांच्या लाभासाठी होणारी अडवणूक आदींसह इतरही कारणांमुळे शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. शेतकऱ्यांपुढे अडचणींचा मोठा डोंगर आहे. कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांना सातत्याने तोंड द्यावे लागते. त्यावर मात करत शेतकऱ्यांचा जगण्याचा संघर्ष सुरू असतो. त्यालाही मर्यादा येत असल्याने परिस्थितीपुढे हतबल होऊन बळीराजा आपले जीवन संपवतो.

कृषी क्षेत्राला फटका

२०२० वर्ष तर शेतकऱ्यांसाठी काळे वर्षच ठरले. करोनाच्या संकटामुळे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना त्याचा जबर फटका बसला. टाळेबंदीमुळे पिकवलेल्या मालाला खरेदीदारदेखील मिळाले नाहीत. त्यामुळे मातीमोल भावात कृषी मालाची विक्री करावी लागली. काही भागांमध्ये अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कापसावर गुलाबी बोंडअळी, सोयाबीनसह विविध पिकांवर किडींचे आक्रमण आदी कारणांमुळे पुन्हा एकदा नापिकी झाली. अगोदरच करोनामुळे अडचणीत असलेले शेतकरी आणखी मोठय़ा आर्थिक संकटात सापडले आहेत. परिणामी, जुलै, ऑगस्ट महिन्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली.

अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम व बुलढाणा या शेतकरी आत्महत्याग्रस्त पाच जिल्हय़ांमध्ये २०२० या वर्षांत तब्बल १२०६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासनदरबारी झाली. आतापर्यंत या पाच जिल्हय़ात २००६ वर्षांमध्ये सर्वाधिक १२९५ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. त्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आकडा २०२० मध्ये समोर आला.
२०१९ मध्ये १०५८ आत्महत्या झाल्या होत्या. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या कर्जमाफीसह सर्वच उपाययोजना निष्फळ ठरल्याचे अधोरेखित होते.

अमरावती जिल्हय़ात सर्वाधिक आत्महत्या

पश्चिम विदर्भातील आत्महत्याग्रस्त पाच जिल्हय़ांमध्ये २०२० वर्षांत अमरावती जिल्हय़ात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. अमरावती जिल्हय़ात ३९९, यवतमाळ ३१९, बुलढाणा २६०, अकोला १३६ व वाशीम जिल्हय़ात ९२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.

२८८ प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष मदत

पश्चिम विदर्भात २०२० मध्ये आत्महत्या केलेल्या १२०६ शेतकऱ्यांपैकी ४४६ आमहत्या प्रकरणे शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवले आहेत. ५११ प्रकरणे मदतीसाठी पात्र असून २०७ प्रकरणांची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. २८८ प्रकरणांमध्ये प्रत्यक्षात मदत देण्यात आली.

२००६ प्रमाणे २०२० या वर्षांत आलेल्या विविध समस्यांमुळे शेतकरी तणावात आहेत. करोना संकट असतानाच नैसर्गिक आपत्ती, नापिकी झाली. तूर, हरभरा, कापसाचे पैसे मिळाले नाहीत. शेतकरी वैतागले असल्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाली. शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत.    – किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन