शेतकरी संघटनेने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर उद्या (गुरुवार) मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. विखे कारखान्याने संगमनेर येथील थोरात कारखान्याप्रमाणेच उसाला भाव द्यावा व मागील गळीत हंगामातील उसाचे अंतिम पेमेंट पाच दिवसांच्या आत अदा करावे अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शेळके व महिला आघाडीप्रमुख प्रभाताई घोगरे यांनी ही माहिती दिली. संघटनेने कारखाना व्यवस्थापनाला दिलेल्या निवेदनात म्हटले, की या वर्षी जिल्ह्यातील संगमनेर कारखान्याने २ हजार ८११, कोळपेवाडी कारखान्याने २ हजार ७११ याप्रमाणे भाव जाहीर केला आहे. आपण राज्याचे कृषिमंत्री आहात, तसेच आपल्या कारखान्याचे उच्चांकी गळीत झाले आहे. साखर उताराही चांगला असल्याने संगमनेर सहकारी साखर कारखान्याप्रमाणे भाव द्यायला हवा. कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक शेतकरी असा दुजाभाव न करता हा भाव दिला पाहिजे. या वर्षी खरिपाची पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी वाढत्या महागाईचा विचार करून आपण राज्यात नंबर एक भाव द्यावा अशी मागणी संघटनेने केली आहे.