राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील जीएम (जेनेटिकली मॉडिफाइड-जनुकीय विकसित) मका बियाण्यांची लागवड तसेच त्याच्या चाचणीला पाठिंबा देण्यासाठी उद्या, बुधवारी सकाळी शेतकरी संघटनेच्या वतीने विद्यापीठासमोर ‘प्रतिनिदर्शने’ केली जाणार आहेत. या प्रयोगाला विरोध करण्यासाठी ‘कोअ‍ॅलिशन  फॉर जीएम फ्री इंडिया’ संस्थेने निदर्शने आयोजित केली आहेत. या संस्थेची भूमिका शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटना हे प्रतिआंदोलन करणार आहे.
शेतकरी संघटनेचे नेते अजित नरदे (कोल्हापूर) व अनिल धनवट (नगर) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी संघटनेचे पदाधिकारी संजय कोले व शीतल राजोबा (सांगली) आदी उपस्थित होते. या प्रतिआंदोलनाच्या वेळी जीएम बियाणे शेतकऱ्यांच्या कशाप्रकारे फायदेशीर आहे, याची माहिती देणारे प्रदर्शनही आंदोलनस्थळी आयोजित केले जाणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना नरदे व धनवट यांनी सांगितले, की जीएम मका लागवडीचे प्रयोग गेल्या ऑगस्टमध्ये राहुरी व परभणी येथील विद्यापीठाच्या जागेत करण्यात आले. हा मका आता डिसेंबरमध्ये काढला जाणार आहे. सध्या दोन्ही ठिकाणी त्याच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांना ‘ग्रीनपीस’ ही संघटना विरोध करत आहे, त्यासाठी या संस्थेने कोयालेशन फॉर जीएम फ्री इंडिया या नावाची भारतीय संस्था पुढे करून विरोध सुरू केला आहे. ही संस्था पगारी कार्यकर्ते नियुक्त करून विरोधी चळवळ चालवत आहे. हे सर्व कार्यकर्ते पुणे-मुंबईत राहणारे व कोणीही प्रत्यक्षात शेती करणारे नाहीत.
जीएम (जनुक बदललेली बियाणे) बियाणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायदेशीर असल्याने शेतकरी संघटनेचा त्याला पाठिंबा आहे. ही बियाणे कशी फायदेशीर आहेत हे बीटी कॉटन, बीटी वांगे यामुळे सिद्ध झाले आहे. यामुळे कापूस उत्पादनात भारत जगात अग्रेसर झाला आहे. जीएम बियाण्यांमुळे कीटकनाशकांचा वापर ८० टक्के कमी होतो. जीएम मका हे बियाणे अमेरिका, इंग्लंड, चीन, अर्जेटिना, ऑस्ट्रेलियात वापरली जात आहेत. परंतु ग्रीनपीस व कोयालेशन संस्था दिशाभूल करून हे बियाणे पर्यावरणाला हानिकारक असल्याच्या अफवा पसरवत आहे. मात्र त्यांचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा मिळू नये असाच आहे. यामागे कीटकनाशक लॉबीचा हात आहे, असाही आरोप नरदे व धनवट यांनी केला.
निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील हे खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत, ते व्यावसायिक आंदोलक आहेत, असाही आरोप दोघांनी केला. जीएम बियाण्यांचा विरोध करण्यासाठी देण्यात आलेल्या सर्व कारणांचे स्पष्टीकरण शेतकरी संघटनेने दिले आहे, परंतु त्यावर संबंधित संस्था चर्चा करत नाही किंवा त्याचा प्रतिवादही करताना दिसत नाही, असा दावा त्यांनी केला.