जिवती तहसील कार्यालयातील घटना; तहसीलदारांवर कारवाई करण्याची मागणी

जिवती तहसीलदार कार्यालयाच्या दालनात तहसीलदारासमोर एका शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. किसन सानप, असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव असून तो शेणगाव येथील रहिवासी आहे.

सानप यांचा जमिनीचा वाद सुरू आहे. परंतु तहसीलदार हे एकतर्फी भूमिका घेऊन सातत्याने अनेकदा वेठीस धरले आहे. त्यांना तारखेवर बोलावून धाकदपट करून त्यांना चुकीच्या पद्धतीने दंडात्मक कारवाई करणे व कार्यालय सुटेपर्यंत बसून ठेवणे, जमानतीसाठी पैशांची मागणी करणे, वेळोवेळी धमकावण्याच्या प्रकारामुळे किसन सानप हे कंटाळले होते. शेवटी तहसीलदारांच्या जाचामुळे कंटाळून टोकाची भूमिका घेत जीवनयात्रा संपवण्यासाठी थेट तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार बेडसे यांच्या कक्षात जाऊन ‘काय साहेब तुम्ही माझा कुटुंब संपवण्यासाठी याठिकाणी बसले आहात का’, असे म्हणत विषप्राशन करीत ‘आता साहेब माझा अंतिम संस्कार तुम्हीच करा’ असे म्हणत जागीच कोसळले. या घटनेचा सर्व क्षेत्रांतून निषेध होत आहे आणि तहसीलदार बेडसे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, किसन सानप यांना गंभीर स्थितीत रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.