नीरव मोदी याच्या कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील जमिनीवर शनिवारी (दि. १४) सकाळी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. या वेळी मोदीच्या येथील सोलर प्लँटचे नामांतर ‘डल्ला भगोडा सोलर प्लँट’ असे करण्यात आले व रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला बांधून त्यावर चाबकाने आसूड ओढले. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष किरण पाटील व अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केले. या आंदोलनामध्ये जलतज्ज्ञ मििलद बांगल, प्रकाश थोरात, भीमराव खेडकर, सोन्याबापू गोयकर, संतोष माने, यशवंत खेडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हिरे व्यापारी नीरव मोदी याला ज्या बँकांनी कर्ज दिले त्याचे ऑडिट न करता डोळेझाक करणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांवर कारवाई करण्याची मागणी काळी आई मुक्ती संग्राम आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे.

आज शनिवार, दि.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांची प्रतिमा झाडाला बांधून शेतकऱ्यांच्या आसुडाचे फटके ओढून प्रतीकात्मक पद्धतीने आंदोलन करण्यात आले. नुकतीच कर्जत तालुक्यातील खंडाळा गावातील ग्रामस्थांची बैठक होऊन, मूळ शेतकऱ्यांना त्यांची जमीन परत मिळण्यासाठी आंदोलनाचा निर्णय झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी हे आंदोलन करण्यात आले. शनिवारी सकाळी सर्व स्थानिक शेतकरी व महिला येथे एकत्र आले.

त्यांनी भारत माता की जय, नीरव मोदी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. यांनतर सोलर प्लँटचा नामांतर कार्यक्रम झाला. या वेळी किरण पाटील यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला केला.

रिझव्‍‌र्ह बँकेने आपली भूमिका चोखपणे पार पाडली असती तर हे प्रकरण घडले नसते. मात्र या प्रकरणाने रिझव्‍‌र्ह बँकेचा ढिसाळ कारभार चव्हाटय़ावर आला असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हटले. तसेच या जमिनीवरील पन्नास एकरवर उभारण्यात आलेल्या सोलर हार्वेस्टिंग वीजनिर्मिती प्रकल्पाचे ‘डल्ला भगोडा सोलर प्लँट’ नामांतर करून या प्रकल्पाच्या उत्पन्नाची रॉयल्टी मूळ शेतकऱ्यांना देण्याची मागणी केली जाणार आहे, असे किरण पाटील या वेळी म्हणाले.