शेकाप आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात रायगडातील शेतकरी आक्रमक झाले आहे. आ. जयंत पाटील यांच्या पीएनपी कंपनीने शहाबाज परिसरातील शेतक ऱ्यांच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गेली १० वर्षे पाठपुरावा करूनही याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतलेली नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला शेकापवगळता सर्व पक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला.
 शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि त्यांचा मुलगा नृपाल पाटील यांच्या मालकीची धरमतर येथे पीएनपी कंपनीची जेटी आहे. ७० गुंठे जागेवर जेटी उभारण्याची परवानगी असताना कंपनीने या परिसरातील जवळपास ७० एकर जमीन बेकायदेशीर पद्धतीने बळकावली आहे. यात शासकीय जमिनी बरोबरच शेतकऱ्यांच्या जमिनींचा समावेश आहे. कंपनीने बेकायदेशीरपणे भराव करून नैसर्गिक नाले बंद केले आहे, सरकारी रस्ता आणि खारबंदिस्तीची योजना गिंळकृत केल्या आहे. बनावट सरकारी कागदपत्रे बनवून अनधिकृत जेटय़ा बांधल्या आहेत. सीआरझेड क्षेत्रात बांधकाम करून दोन इमारती बांधल्या आहेत. या इमारती पाडण्याचे आदेश होऊनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कंपनीने संरक्षित कांदळवनांची कत्तल केल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही याबाबत कोणतीही कारवाई जिल्हा प्रशासनाने केलेली नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे.   महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला शेकापवगळता सर्व पक्षीय नेत्यांचा पाठिंबा मिळाला आहे. पीएनपी कंपनीने शेतकऱ्यांनी गेल्या दहा वर्षांसाठी प्रती एकरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कांदळवनांची तोड केल्या प्रकरणी कंपनीच्या मालकांवर गुन्हे दाखल केले जावे, कंपनीने अतिक्रमित केलेली २५ हेक्टर जमीन तात्काळ ताब्यात घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे शहाबाज बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ पाटील यांनी सांगीतले.   या आंदोलना वेळी माजी आमदार मधुकर ठाकूर, काँग्रेस तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे प्रतोद महेंद्र दळवी, राष्ट्रवादीचे नेते राजा केणी, परशुराम म्हात्रे आणि शिवसेनेचे तालुका अध्यक्ष हेमंत पाटील हेदेखील उपस्थित होते. आमदार जयंत पाटलांना पाठीशी घालण्याचे काम जिल्हा प्रशासन करते आहे. ते जिल्हाधिकाऱ्यांचे जावई  आहेत का असा संतप्त सवाल त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची वाट पाहू नका, असे त्यांनी म्हटले. यापुढे निवेदन दिली जाणार नाहीत शेतकरी जागा ताब्यात घेतील, असा इशारा त्यांनी दिला.