कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी यासाठी नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विंचूर – प्रकाशा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनांच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय शेजूळ व पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले. जी तत्परता भाव वाढ झाल्यावर निर्यात बंदीसाठी केंद्र सरकार दाखवते ती तत्परता भाव कोसळल्यावर का दाखवत नाही? असा सवाल यावेळी शेतकऱ्यांनी विचारला आहे.

शेतकरी संघटनांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, केंद्राने नुकताच आंध्र प्रदेशातील केपी कांद्याला निर्यातीची परवानगी दिली आहे. सर्वात जास्त कांदा उत्पादक महाराष्ट्र राज्य असून येथे चांगल्या पद्धतीचे कांदा उत्पादन येते. तरी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय का? जी तत्परता भाव वाढ झाल्यावर निर्यात बंदीसाठी केंद्र सरकार दाखवते ती तत्परता भाव कोसळल्यावर का दाखवत नाही? नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. आगामी काळात ५१ लाख मेट्रिक टन कांदा विक्रीस येणार आहे. अशा परिस्थितीत केंद्राने तात्काळ निर्यात खुली करून कष्टकरी शेतकऱ्यांच्या कांद्याला परदेश वारीसाठी मुक्त केले पाहिजे. तसे न झाल्यास रेल रोकोसह संपूर्ण महाराष्ट्रात याहीपेक्षा मोठं आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.