जमिनी ताब्यात घेण्याच्या विरोधातून जाळपोळ; नेवाळीत १२ पोलिसांसह ३० जण जखमी

स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी विमानतळ उभारण्यासाठी अधिग्रहण केलेल्या मात्र, कालांतराने नौदलाच्या ताब्यात गेलेल्या कल्याण तालुक्यातील १६७६ एकर जमिनीवरून गुरुवारी नेवाळी परिसरात मोठा संघर्ष उफाळून आला. नौदल प्रशासनाकडून जमिनी कसण्यास अटकाव करण्यात आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन केले. या वेळी काटई-कर्जत महामार्ग रोखून धरत वाहने पेटवून देण्यात आली. या वेळी झालेल्या चकमकीत १२ पोलीस आणि १७ आंदोलनकर्ते जखमी झाले. गुरुवारी सकाळी सुरू झालेला हा संघर्ष दुपारी, सुरक्षा यंत्रणांचा बंदोबस्त वाढवण्यात आल्यानंतर निवळला व परिस्थिती पूर्वपदावर आली; परंतु या घटनेनंतर नेवाळी परिसरात तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे.

ब्रिटिशांच्या काळात संपादित करण्यात आलेली ही जमीन स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्य दल व नंतर नौदल प्रशासनाच्या ताब्यात आली; परंतु गेल्या ७० वर्षांत ही जमीन तशीच पडून आहे. नौदलाने अलीकडेच आपल्या ताब्यातील जमिनीभोवती संरक्षक भिंत उभारण्यास सुरुवात केल्यानंतर नेवाळी परिसरात धुसफुस सुरू झाली होती. त्यातच नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना या जमिनीवर लागवड करण्यासही मज्जाव केल्याने गुरुवारी संतापाचा भडका उडाला. संतप्त शेतकऱ्यांनी सामूहिकपणे रस्त्यावर येत आंदोलन केले. गावकऱ्यांच्या जमावाने रस्त्यावर टायर जाळत गाडय़ांची जाळपोळ केली. तसेच पोलिसांना मारहाणही केली. या वेळी झालेल्या दगडफेकीत १२ पोलीस तर पोलिसांच्या कारवाईत १७ आंदोलनकर्ते जखमी झाले. या आंदोलनामुळे डोंबिवली- कर्जत महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. आंदोलनादरम्यान जमाव हिंसक झाल्याने शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी आणि परिमंडळ चारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्वच पोलीस ठाण्यांतील पोलिसांना येथे पाचारण करण्यात आले होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, स्थानिक आमदार गणपत गायकवाड आणि आमदार किसन कथोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच ग्रामस्थांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन या मुद्दय़ावर केंद्र आणि राज्य सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. परिसरात प्रचंड फौजफाटा दाखल झाल्यानंतर येथील संघर्ष निवळला.