News Flash

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी रस्त्यावर

देवळा येथील घटना, कळवण येथे रास्ता रोको

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी रस्त्यावर
दर घसरत असल्याने शेतकऱ्यांनी देवळा येथे रस्त्यावर कांदे फेकून संताप व्यक्त केला  (छाया- महेश सोनकुळे)

देवळा येथील घटना, कळवण येथे रास्ता रोको

कांद्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीचे पडसाद नाशिक जिल्ह्य़ात ठिकठिकाणी उमटू लागले असून देवळा येथे कांदे रस्त्यावर फेकण्यात आले, तर कळवण येथे रास्ता रोको करण्यात आला.

देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथील शेतकरी पंडित मेधने यांनी कांद्याला भाव न मिळाल्याने विंचूर-प्रकाशा महामार्गावर पाचकंदील चौकात सायंकाळी पाचच्या सुमारास दोन ट्रॉली कांदा रस्त्यावर फेकून देत शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला. उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळेल आणि दोन पैसे हाती येतील, या अपेक्षेने वर्षभर कांदा चाळीत साठवून देखील दरात सातत्याने घसरण होत आहे. शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कांदा रस्त्यावर ओतण्याच्या या अचानक झालेल्या प्रकारानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी भेट देत पहाणी केली. तहसीलदारांनी पोलीस निरीक्षक आणि शेतकऱ्यांची बैठक घेत कायदा सुव्यवस्थेला बाधा येईल अशी कृती करू नका, असे आवाहन केले. वाहनांखाली चिरडलेले कांदे भरून रस्ता स्वच्छ करण्यात आला.

कळवण येथेही कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सकाळी ११ वाजता कळवण येथील बस स्थानक परिसरात अचानक रास्ता रोको आंदोलन केले. तसेच प्रांत कार्यालयासमोर कांदे ओतून शासनाच्या शेतीवरोधी धोरणांचा निषेध केला. महाराष्ट्रात गावठी कांद्यासाठी नाशिक जिल्हा आणि त्यातही कळवण तालुका प्रसिद्ध आहे. यंदा सुरूवातीपासूनच कांद्याला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. बुधवारी कळवणचा आठवडा बाजार असल्याने आंदोलनासाठी गर्दी झाली होती. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनाला भाजप वगळता सर्व पक्षांनी पाठिंबा दिला . कळवणचे तहसीलदार कैलास चावडे यांना यावेळी आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले. आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार यांच्यासह इतरांनी सहभाग घेतला.

महाशिबिर उधळणार

राज्य सरकारकडून दोन डिसेंबर रोजी अटल महाआरोग्य शिबीर होणार आहे. या शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्या आधी कांद्याच्या दरात सुधारणा न झाल्यास काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात येईल. तसेच कांदा मारो आंदोलन करून महाआरोग्य शिबिर उधळण्यात येईल.  – महेंद्र हिरे (काँग्रेस तालुकाध्यक्ष) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 1:02 am

Web Title: farmers are in a very bad condition in maharashtra 25
Next Stories
1 नाणार तूर्त बासनात
2 सहकारमंत्री सुभाष देशमुखांना मोठा दणका, ‘लोकमंगल’वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
3 माजी खा. निवेदिता मानेंचा राष्ट्रवादीला रामराम, तर मुलाचा शिवसेनेत प्रवेश
Just Now!
X