|| एजाजहुसेन मुजावर

काटगावमधील शेतकऱ्यासह अनेक उत्पादकांना जोरदार फटका

उत्पादनाचा खर्च आणि विक्रीची किंमत याचे गणित इतके व्यस्त झाले आहे की बाजारात आणलेला कांदा पुन्हा घरी नेण्यासाठी खर्च करावा लागू नये यासाठी व्यापाऱ्यालाच वर पैसे देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काटगावातील शेतकरी  विक्रम कोल्हे यांना अडीच टन कांदा विकून अवघे २०८७ रुपये मिळाले, तर नुसता वाहतूक, तोलाई आणि हमाली खर्च २४३० रुपये आल्याने वर व्यापाऱ्यालाच ३४३ रुपये देण्याची पाळी आली. यात कांदा उत्पादनाचा खर्च धरलेला नसल्याने कांदा उत्पादकांना किती फटका बसला आहे, हे स्पष्ट होत आहे.

शेतात राबून आणि खर्च करून पिकविलेला कांदा सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीत अक्षरश: मातीमोल ठरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.

खरीप हंगामात पाणीटंचाई असतानाही काटगावचे विक्रम कोल्हे यांनी दुसऱ्याकडून पाणी मागवून कांद्याचे पीक घेतले होते. शेतात हातातोंडाशी आलेल्या कांद्याला मेहनतीच्या मोबदल्याएवढा तरी दर मिळावा, अशी त्यांची रास्त अपेक्षा होती. त्यांनी सोलापूर कृषी बाजारात गेल्या २८ नोव्हेंबर रोजी सुमारे अडीच टन कांदा विकण्यासाठी आणला होता. या कांद्याला केवळ २०८७ रुपये एवढाच भाव आला. प्रत्यक्षात हमालीचे १६७.८५ रुपये, तोलाईचे ७० रुपये आणि वाहतूक खर्चाचे २१९१ रुपये याप्रमाणे खर्च सोसावा लागला. कांदा दरापोटी हाती पडलेले २०८७ रुपये आणि त्यावर झालेला खर्च २४३० रुपये पाहता कोल्हे यांना कांद्याचे पैसे तर मिळालेच नाहीत, तर उलट त्यांना पदरचे ३४३ रुपये व्यापाऱ्याकडे भरावे लागले. हा प्रसंग सांगताना कोल्हे यांचे डोळे पाणावले होते.

कांद्याच्या लागवडीसाठी झालेला भरमसाट खर्च आणि बाजारात मिळालेला भाव यात जमीन-अस्मानाचा फरक असताना वर पुन्हा पदरचेच पैसे व्यापाऱ्याला देण्याची वेळ आल्याने घरात गेल्यानंतर पत्नी आणि मुलांना काय सांगायचे, याची चिंता कोल्हे यांच्या चेहऱ्यावर ठळकपणे दिसत होती. अशी अनेक उदाहरणे देता येतील. नोव्हेंबरमध्ये सोलापूर कृषिउत्पन्न बाजारात पाच लाख ८२ हजार ९४७ क्विंटल कांद्याची आवक होऊन त्यात ४३ कोटी ४६ लाख ४७ हजारांची उलाढाल झाली होती. कांद्याला सर्वसाधारण दर मिळाला तो केवळ ७०० रुपये. २३०० रुपये कमाल दर १२ नोव्हेंबरला एकाच दिवशी मिळाला. एरव्ही महिनाभर १५०० ते १८०० रुपयांपर्यंत कमाल दर दिला गेला. या कमाल दराचा बाजारात आलेला कांदा जेमतेम पाच टक्केदेखील नव्हता.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील रामपूर या गावातून आलेले चिदानंद भीमसेन शिवशेट्टी आणि उमेश हिरेमठ यांनी ७५ क्विंटल कांदा आणला होता. त्यास प्रतिक्विंटल तुलनेत जास्त म्हणजे ८०० रुपये भाव मिळाला. परंतु हमाली, तोलाई आणि वाहतूक खर्च वजा जाता फारच तुटपुंजी रक्कम त्यांच्या पदरी पडली. यात कांदा कापणीचा खर्चही धरला नाही. कांदा लागवड, खुरपण, औषध फवारणी, खते, पाणी, वीजबिल असा मिळून एकरी सरासरी ४० हजारांपर्यंत खर्च झाला.  परंतु कांद्याचा घसरलेला दर पाहता खर्चाचा मेळ कसा घालायचा, याचा हिशेब तुम्हीच सांगा, असे शिवशेट्टी आणि हिरेमठ सांगत होते.

गेल्या वर्षी चांगला दर..

मागील वर्षी याच नोव्हेंबर महिन्यात कांद्याला समाधानकारक दर मिळाला होता. त्यावेळी बाजारात पाच लाख ४३ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यातून तब्बल १०९ कोटी १४ लाख १२ हजारांइतकी उलाढाल झाली होती. त्या वेळी कांद्याला सर्वसाधारण दर २३०० रुपये  होता.