02 March 2021

News Flash

थंडीमुळे द्राक्ष निर्यात गोठण्याची भीती

द्राक्ष बागांवरील प्रतिकूल परिणामांमुळे उत्पादकांना हुडहुडी

द्राक्ष बागा वाचविण्यासाठी शेकोटीचा आधार घेतला जात आहे.

|| अनिकेत साठे

द्राक्ष बागांवरील प्रतिकूल परिणामांमुळे उत्पादकांना हुडहुडी

यंदाच्या हंगामात मुबलक द्राक्ष उत्पादनामुळे गतवेळच्या तुलनेत अधिक निर्यात होईल, या उत्पादकांच्या आशेवर कडाक्याची थंडी पाणी फेरण्याच्या मार्गावर आहे. दिवसागणिक घटणाऱ्या तापमानाने शनिवारी नीचांकी ५.१ अंश सेल्सिअसची पातळी गाठली. अवघा परिसर गारठल्याने द्राक्षवेली, द्राक्ष घडांचा विकास खुंटला असून परिपक्व मण्यांना तडे जाऊ लागले आहे. याचा परिणाम उत्पादनासह निर्यातीवर होण्याची भीती आहे.

थंडीने मुक्काम ठोकल्याने जिल्ह्य़ातील सुमारे दोन लाख एकरांवरील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. अलीकडच्या काळापर्यंत वातावरण पोषक राहिल्याने द्राक्षांचे मुबलक उत्पादन होण्याचा अंदाज होता. हंगामपूर्व द्राक्षांना किलोला ८० ते १०० रुपये असे दर मिळाल्याने उत्पादकांचा उत्साह दुणावला. डिसेंबरअखेरीस हवामानातील बदल द्राक्ष बागांवर विपरीत परिणाम करणारे ठरले. सध्या द्राक्षमण्यांत साखर उतरणे, त्यांची फुगवण प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी द्राक्ष घड परिपक्व होत असून त्या बागा लवकरच काढणीवर येतील. या सर्व बागांना थंडीचा तडाखा बसत आहे. बागायतदार संघाने उभारलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राच्या शृंखलेतून मिळणाऱ्या अंदाजाच्या आधारे उत्पादक बागा वाचविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करीत आहे. तापमान खाली जाऊ नये म्हणून बागांना पाणी देणे, शेकोटी पेटवून धडपड सुरू आहे.

निर्यातीसाठी द्राक्षमण्यांचा आकार १६ मिलीमीटरपेक्षा अधिक असावा लागतो. मण्यांची वाढ खुंटल्याने तो आकार प्राप्त होईल की नाही, याबद्दल धास्ती आहे. द्राक्षमण्यांना तडे गेले, डाग पडल्यास त्याचा रंग, दर्जावर परिणाम होतो. द्राक्ष निर्यातदार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मागील हंगामात सव्वादोन लाख मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. त्यातून देशाला दोन हजार कोटींहून अधिक रुपयांचे परकीय चलन मिळाले. या हंगामात अडीच लाख मेट्रिक टनपर्यंत निर्यात होईल, असा संघटनेचा अंदाज आहे. आतापर्यंत सुमारे ३०० कंटेनर द्राक्ष रशिया, बांगलादेशमध्ये पाठविण्यात आले. युरोपीय देशात निर्यात सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाचे दरवाजे भारतीय द्राक्षांसाठी प्रथमच खुले झाले आहेत. निर्यातीचा आलेख उंचावण्यास अनुकूल स्थिती असताना कडाक्याची थंडी त्यात अडथळे आणणार असल्याचे चित्र आहे.

कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. काही भागांत तसे प्रकार घडू लागले आहेत. सध्याच्या वातावरणात द्राक्ष बागा तयार होण्याचा कालावधी लांबणार आहे. हंगामपूर्व अर्थात ‘अर्ली’ बागा छाटणीनंतर १२० ते १३० दिवसांत तयार होतात. उर्वरित द्राक्ष बागांना साधारणत: १५० दिवसांचा कालावधी लागतो. आता काढणीला १६० ते १७० दिवस लागतील. नुकसान टळल्यास निर्यातीवर परिणाम होणार नाही.    – जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, द्राक्ष निर्यातदार संघटना

तापमान सात ते आठ अंशाच्या खाली गेल्यास द्राक्षवेली सुप्तावस्थेत जातात. द्राक्षमण्यांचा विकास थांबतो. गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्ष बागांची ही अवस्था झाली आहे. यामुळे मण्यांना अपेक्षित आकार मिळणार नाही. त्याचा परिणाम निर्यातीवर होईल.   – रवींद्र बोराडे, विभागीय अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 12:08 am

Web Title: farmers are in a very bad condition in maharashtra 32
Next Stories
1 भूसंपादन रखडल्याने भुर्दंड
2 मुदतीनंतर पुस्तक जमा करणाऱ्यांना आता प्रतिदिवस एक रुपया दंड
3 पक्क्या रस्त्यांअभावी पेठ तालुक्यात रुग्णसेवा, शिक्षणाच्या मार्गात अडचणी
Just Now!
X