पावसाळ्यामध्ये डोंगरदऱ्यांतून येणारे पाणी ओहोळामार्फत कुंडलिका नदीमध्ये नेणाऱ्या नाल्याची अवस्था गाळ व वनस्पतीने पूर्ण भरल्यामुळे भयावह आल्याने नाल्यातून वाहून जाणारे पाणी आजूबाजूच्या सुमारे चारशे एकर भातशेतीमध्ये तुंबून राहत असल्याने गेली अनेक वर्षे ही भातशेती ओसाड राहत असल्याचे चित्र समोर आले आहे.
सदर ओहोळ-नाला धामणसई, सोनगाव, वांदेली, मढाळी, पिंगळस, अष्टमी, पडम या गावांतून वाहन कुंडलिका नदीला जाऊन मिळतो. गेल्या काही वर्षांमध्ये या नाल्याची सफाई न आल्याने गाळाने-वनस्पतीने पूर्ण भरला आहे. परिणामी पाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरामधील सुमारे चारशे एकर भातशेतीमध्ये भाताची एक कांडीसुद्धा रुजत नाही.
रोहे तालुक्यामधील ही सारी गावे रोहे पंचायत समितीमध्ये समाविष्ट आहेत तर विधानसभा मतदारसंघासाठी पेण मतदारसंघामध्ये आहेत. पंचायत समिती, जि.प. सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व भागाचे आमदार शेतकरी कामगार पक्षाचे अशा कात्रीमध्ये येथील शेतकरी सापडला असून आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना अशी त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
कृषी विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र या समस्येच्या निवारणासाठी कुणीही पुढाकार घेत नाही, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे.