गत काही दिवसांत महाराष्ट्रातील शेतीला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. या आपत्तीचा सर्वाथाने बळी ठरला तो येथला शेतकरी. संपूर्ण राज्य नववर्ष स्वागताच्या तयारीत असताना, शेतकऱ्याच्या शेतात मात्र दिसत आहेत त्या मातीमोल झालेल्या पिकांच्या गुढय़ा.
त्याचा गुढीपाडवा साजरा होणार आहे तो वेदनांची कडू पाने खाऊनच. त्याच्या व्यथा-वेदनांची ही खबरबात..
शेती हा बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे. खर्च करूनही पिकांना भाव मिळत नाही. त्यात नैसर्गिक आपत्तीमुळे हाती पडणारेही अकस्मात हिरावले जाते. शेतीच्या या अशा अवस्थेमुळे व्यवस्थापनशास्त्र अर्थात ‘एमबीए’चे शिक्षण घेऊन घरची ४० एकर शेती सांभाळणाऱ्या मुलास लग्नासाठी कोणी मुलगी देण्यास तयार नाही.
दिंडोरी तालुक्यातील तिसगावचे गारपीटग्रस्त द्राक्ष उत्पाद्र आपली व्यथा मांडत होते. मुबलक पाणी असणाऱ्या भागात ही स्थिती असताना कमी पाणी असणाऱ्या गावांमध्ये लग्नाचे वय झालेल्या शेतकरी मुलांची संख्या कितीतरी अधिक आहे. खुद्द शेतकरीदेखील त्यांना आपली मुलगी देण्यास तयार नाही. गारपीट व अवकाळी पावसाने दृष्टचक्रात सापडलेल्या ग्रामीण भागातील हे स्थित्यंतर धक्कादायक आहे.
सलग पाच दिवसांच्या गारपीट व अवकाळी पावसाने जिल्ह्य़ातील सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, डाळिंब, गहू, कांदा आदी पिके भुईसपाट झाली. सलग दीड ते दोन वर्षांपासून निसर्ग शेतकऱ्यांवर असाच कोसळत आहे. मागील चार महिन्यांचा विचार केल्यास अशा स्वरूपाचे पाच ते सहा वेळा नुकसान झाले. या संकटांनी शेतकऱ्याचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आपत्तीने ग्रामीण भागातील धक्कादायक पदर उलगडले आहेत. काही वर्षांपूर्वी शेतकरी मुलीसाठी वरसंशोधन करताना किती शेती आहे, पिके कोणती याचा प्राधान्यक्रमाने विचार करत. पण आता शेतकरीच शेतकऱ्याला मुलगी देण्यास तयार नसल्याचे बागलाण येथील डॉ. शेषराव पाटील यांनी सांगितले. चिराई या आमच्या गावात ५५ ते ६० तरुण लग्नासाठी मुलींच्या प्रतीक्षेत आहेत. मुली मिळत नसल्याने नागपूर व उस्मानाबाद इथपर्यंत मुली शोधण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. बागलाण तालुक्यातील हा भाग तसा कमी पावसाचा. मात्र गतवर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे पिके चांगली आली होती. गारपिटीने सर्वाना उद्ध्वस्त केले. या बाबींमुळे परिसरातील १६ ते १७ गावांमध्ये मुली देण्यास कोणी धजावत नसल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची ही व्यथा आहे. िदडोरी तालुक्यात ४० एकर द्राक्ष बाग असणाऱ्या उत्पादकाने मुलाला ‘एमबीए’पर्यंत शिक्षण दिले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्यावर शेतीची जबाबदारी सोपविण्यात आली. पण आता त्याला कोणी मुलगी देण्यास तयार नाही. इतके शिक्षण दिले तर नोकरी का करत नाही, असे प्रश्न आडून विचारण्यात येत असल्याचे वडिलांनी सांगितले. अनेक गावांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतीतील उत्पन्नावर शेतकरीच विश्वास ठेवायला तयार नाही. एखाद्या कारखान्यात काम करणारा कामगार अर्थात नोकरदार मुलगा चालेल, पण शेती करणारा नको, अशी बहुतांश वधुपित्यांची भूमिका आहे. नैसर्गिक संकटाने ग्रामीण भागाचे आर्थिक कंबरडे मोडले. पण त्याचबरोबर हा भयावह सामाजिक प्रश्नही निर्माण केल्याचे अधोरेखित होत आहे.
मुलींचे लग्न सोहळेही लांबणीवर
नैसर्गिक आपत्तीत अकस्मात प्रचंड नुकसानीला सामोरे जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आपल्या मुलींचे आधी निश्चित केलेले लग्न सोहळे पार पाडणे जिकिरीचे झाले आहे. द्राक्ष, डाळिंब व कांद्यातून हाती पडणाऱ्या पैशातून अनेकांनी मुलींचे लग्न निश्चित केले होते. परंतु एका झटक्यात सर्व होत्याचे नव्हते झाल्यामुळे हे लग्न कसे करावे, या प्रश्नाने ते भयग्रस्त झाले आहेत. काहींनी निश्चित केलेले घरातील लग्न वर्षभरासाठी लांबणीवर टाकता येईल काय, या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
narayan rane
शिंदे गट भाजपवर नाराज! राणे यांच्या विधानांमुळे दुखावल्याची भावना, जागावाटपाचा तिढा कायम