मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी  घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली गेली. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ होणार आहे. मात्र, विरोधीपक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी सरकारला सरकट कर्जमाफीचं काय झालं? सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाचं काय झाल? असा प्रश्न करत, निषेध नोंदवला आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा देखील  फडणवीस यांनी आरोप केला आहे.

राष्ट्रपती शासन असताना राज्यपालांनी आठ हजार रुपये हेक्टरी पिकांकरता व १८ हजार रुपये फळबागांकरिता ही घोषणा करून पैसे दिले, तेवढेच पैसे शेतकऱ्यांना आता मिळणार आहेत. या नवीन तिघाडी सरकारने एक नवा पैसा देखील शेतकऱ्यांना दिला नाही. २५ हजारांचं आश्वासन न पाळता, शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याचं काम या सरकारने केलं आहे. आज आणखी एक विश्वासघात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने केला, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की, सरकट कर्जमाफी व सातबारा कोरा आज मात्र या शब्दावरून ते पलटले व दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करू असे सांगितले मात्र ही कर्जमाफी देखील उधारीची आहे, असे फडणवीस पत्रकारपरिषदेत म्हणाले.

मार्चमध्ये आम्ही कर्जमाफी करू असे सांगितले आहे, मात्र आता या कर्जमाफीचा कुठलाही तपशील दिलेला नाही. आमचा सवाल आहे की, आपण सातबारा कोरा करणार असं सांगितलं होतं. दोन लाखांच्या कर्जमाफीत साताबार कोरा होतो का? कर्जमुक्ती होते का? शेतकरी कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त करू असं म्हणत होता, मग शेतकरी चिंतामुक्त झाला का? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.

याचबरोबर, आमच्या सरकारने दीड लाखांपर्यंत सरकट कर्जमाफी दिली होती. आम्ही त्यातून केवळ सरकारी नोकर आणि आमदार, खासदार वगळले होते. बाकी सर्व शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी दिली होती. आता या सरकारने घोषित केलं आहे की, आम्ही सप्टेंबर २०१९ पर्यंतच्या शेतकऱ्यांना थकीत कर्जाची माफी देऊ. यात पीक कर्ज आहे का? की मध्यम मुदतीचं कर्ज आहे, की ट्रक्टरचं देखील कर्ज आहे, की सर्वच प्रकारचे कर्ज आहेत. आम्ही पीक कर्ज व मध्यम मुदतीचं कर्ज माफ केलं होतं. परंतु, या ठिकणी तसं स्पष्ट झालेलं नसल्याचे फडणवीस यांनी सांगितलं.