सोलापूर शहर व जिल्ह्य़ाच्या बहुतांश भागात रविवारी दुपारनंतर पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. तर ग्रामीण भागात हा पाऊस खरीप पेरण्यांसाठी पोषक ठरल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्य़ात यंदा मृग, आद्रा ही दोन्ही नक्षत्रे जवळपास कोरडी गेली असून त्यामुळे खरीप हंगामही अक्षरश: वाया गेल्यात जमा आहे. सद्यस्थितीत खरिपाच्या जेमतेम एक-दोन टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पावसाने दगा दिल्यामुळे पिकांच्या पेरण्यांबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत. पावसाअभावी जिल्ह्य़ात सध्या सुमारे १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असताना पुनर्वसू नक्षत्रही कोरडे जाणार की काय, अशी भीती निर्माण होत आहे. अखेर या नक्षत्राच्या पावसाने दुस-यांदा हजेरी लावून दिलासा दिला आहे.
रविवारी दुपारी आकाशात ढगांची गर्दी होऊन पावसाच्या आगमनाची चाहूल मिळाली व त्यापाठोपाठ पावसाला प्रारंभ झाला. सुमारे पाऊण तास पाऊस पडत होता. शहरात पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. यात वाहनधारकांची धांदल उडाली. तर ग्रामीण भागात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा आदी भागांत पावसाने हजेरी लावल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी आकाशाकडे डोळे लावून शेतात खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी जमिनींची मशागत करून ठेवली होती. सुदैवाने पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.