News Flash

हिरवेगार शिवार माणसांनी बहरले

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रविवारी वेळा अमावस्या उत्साहात साजरी केली.

हिरवळीने नटलेले शेतशिवार दिवसभर माणसांनी फुलून गेले होते.

जिल्ह्यत वेळा अमावस्या उत्साहात साजरी

पांडवपूजन.. विविध भाज्यांचे मिश्रण असलेली भाजी.. ज्वारी, बाजरीचे उंडे.. आंबील अशा फक्कड वनभोजनाचा शिवारात आस्वाद घेत आप्तेष्ट, मित्रमंडळींसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रविवारी वेळा अमावस्या उत्साहात साजरी केली. हिरवळीने नटलेले शेतशिवार दिवसभर माणसांनी फुलून गेले होते.

मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या म्हणजे पांडवपूजेचा दिवस मानला जातो. ज्वारी, गव्हाच्या ताटव्यांमध्ये प्रतीकात्मक पांडवांची पूजा, हे आजच्या दिवसाचे महत्त्व मानले जाते. या पूजेतून पाच पांडवांना शेतातील पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली जाते, अशी श्रद्धा आहे. शेपू, पालक, चुका, मेथी, बोरे आदी पालेभाज्यांच्या मिश्रणाने तयार केलेली भाजी, आंबी, ज्वारी व बाजरीच्या पिठाचे उंडे हे या पांडव पूजेतील नवेद्याचे वैशिष्टय़. पुरणपोळी, शेंगदाणा, गुळाच्या पोळ्यांनाही या भोजनात विशेष स्थान असते.

दुपारी बारानंतर शिवारांमध्ये मुख्य पूजा झाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी कुटुंबीयांसह, मित्रमंडळी, नातेवाइकांबरोबर स्नेहभोजन केले. सर्वत्र भोजनाच्या मफलीने शिवारे फुलून गेली होती. यंदा उशिरा का होईना पाऊसमान चांगले झाले. खरीप हातून गेला तरी रब्बीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांमध्ये या सणाचा उत्साह दिसून आला.

वेळा अमावस्या म्हणजे काय

कन्नड भाषेत येळ म्हणजे सात. कर्नाटकमध्ये पेरणीनंतर सातव्या अमावस्येला येळ्ळी अमावस्या साजरी केली जाते. मूळ कन्नड शब्द असलेल्या येळ्ळी अमावस्या याचा अपभ्रंश होऊन तो कर्नाटकच्या सीमेवरील मराठवाडय़ात लातूर, उस्मानाबाद, बीड तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागात येळ अमावस्या किंवा वेळ अमावस्या असा झाला. या अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्यादेखील म्हणतात. वेळ अमावस्येला शेतात उत्पादित होणाऱ्या सगळ्या गोष्टींची तसेच ग्रामदेवतांची पूजा केली जाते. काळीआई अर्थात भूदेवता यांची देखील पूजा केली जाते, कर्नाटकातील यल्लमा देवीचा या अमावस्येशी संबंध असावा, असेही मानले जाते. या सणाचा कृषी संस्कृतीशी असलेला संबंध अधिकरीत्या स्पष्ट होतो.

शहरात जणू अघोषित संचारबंदी

वेळा अमावस्येनिमित्त उस्मानाबादेत सकाळी १० वाजल्यानंतर शुकशुकाट होता. रविवार सुटीचा दिवस आणि वेळा अमावस्येच्या सणामुळे सकाळपासूनच बाजारपेठ बंद होती, तर रविवारचा आठवडी बाजारही भरला नाही. त्यामुळे शहरात दिवसभर अघोषित संचारबंदीचे चित्र होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:02 am

Web Title: farmers celebrated margashirsha amavasya 2017
Next Stories
1 पीडित महिलेची तक्रार शिर्डी पोलिसांनी टाळल्याने अखेर धुळ्यात फिर्याद दाखल
2 वृद्धाच्या हत्येप्रकरणी सून, नातवास पोलीस कोठडी
3 नांदुऱ्यात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
Just Now!
X