सुकाणू समितीचे सदस्य उद्या दुपारी १ वाजता सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाशी चर्चा करण्यासाठी जाणार आहेत. आज मुंबईत पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या चर्चेनंतर शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे, मात्र तोपर्यंत आंदोलन होणारच अशी ठाम भूमिका सुकाणू समितीने घेतली आहे. उद्या होणाऱ्या बैठकीसंदर्भात जे निमंत्रण सरकारने पाठवले आहे ते आम्ही स्वीकारले आहे अशी माहिती सुकाणू समितीच्या पत्रकार परिषदेत खासदार राजू शेट्टी यांनी दिली. तसेच शेतकऱ्यांशी चर्चा करायला सरकार तयार आहे असे सांगून, सरकारने आम्हाला शेतकरी म्हणून सर्टिफिकेट दिले, असाही टोला लगावला.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, कर्ज उपलब्ध करून द्यावीत आणि आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि त्यावर आम्ही माघार घेणार नाही. या मागण्या जर सरकारने मान्य केल्या तर आंदोलनाचे काय होणार हे उद्या ठरवले जाईल तोपर्यंत आंदोलनाची दिशा मुळीच बदलणार नाही असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच समन्वयक म्हणून अजित नवले काम पाहतील अशी माहितीही राजू शेट्टी यांनी दिली आहे.

दरम्यान पत्रकार परिषद सुरू असताना राजू शेट्टी, शेकापचे जयंत पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यात मात्र समन्वय नसल्याचे दिसून आले. रविवारी होणाऱ्या बैठकीला किती १० ते १५ सदस्य जातील अशी घोषणा जयंत पाटील यांनी केली. तसेच या सदस्यांची निवड राजू शेट्टी करणार आहेत असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ज्यानंतर लगेचच रघुनाथ पाटील यांनी सुकाणू समितीतले ३५ च्या ३५ सदस्य जातील अशी घोषणा केली. रघुनाथ आज झालेल्या बैठकीला उशिरा आले त्यामुळे त्यांना फारशी माहिती नाही असे जयंत पाटील म्हटले. मात्र रघुनाथ पाटील यांनी आपले म्हणणे रेटून मांडले. त्यानंतर जयंत पाटील यांनी सारवासारव करत उद्या होणाऱ्या बैठकीसाठी सगळे सदस्य येण्यास सरकारची हरकत नाही असे म्हटले. त्यानंतर पुन्हा एकदा माईक हातात घेऊन रघुनाथ पाटील यांनी ३५ सदस्य बैठकीला जातील असे आश्वासन दिले. तसेच ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी हा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशी घोषणा रघुनाथ पाटील यांनी केली.

आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत हे सांगताना आज झालेल्या पत्रकार परिषदेत मात्र विसंवादच बघायला मिळाला. नाशिक हे शेतकरी आंदोलनाचे केंद्र आहे. तसेच हे आंदोलन हे शेतकऱ्यांचे आहे, इथे कोणीही मुख्य नाही, सगळ्यांना आपले म्हणणे मांडण्याचा समान हक्क आहे असाही दावा जयंत पाटील यांनी केला. तसेच आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत हे देखील जयंत पाटील यांनी वारंवार सांगितले. आता रविवारी होणाऱ्या बैठकीनंतरच आंदोलनाचे काय होणार हे ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.