सुभाष देशमुख यांचा दावा

यापूर्वीच्या संपुआ सरकारने शेतक ऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुमारे नऊ महिन्यांचा विलंब लावला होता. त्या तुलनेत आमचे सरकार कमी कालावधीत शेतक ऱ्यांना कर्जमाफी देत आहे. येत्या दिवाळीच्या आत कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी होणार आणि शेतक ऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड होणार असल्याचा दावा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे.

यासंदर्भात सोमवारी सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप करताना देशमुख यांनी पुढील आठवडय़ापासून राज्यात उडीद व मूगडाळीची खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याचेही जाहीर केले.

१८ जूनरोजी सरकारने शेती कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया सुरू झाली. राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर विविध यंत्रणा कार्यरत असून या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याच्यादृष्टीने विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना मंत्रालयाच्या स्तरावर करण्यात आली आहे. राज्यात ८९ लाख शेतकरी खातेदारांपैकी ७७ लाख शेतकरी खातेदारांनी शेती कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. ही प्रक्रिया संपली असून आता बँंकांनी कागदपत्रे भरून द्यायची आहेत. आठवडय़ात हे काम पूर्ण झाल्यानंतर दिवाळीच्या आत प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ शेतक ऱ्यांना मिळेल, असे सहकारमंत्री देशमुख यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे चार महिन्यांचा अवधी लागत आहे. मात्र यापूर्वी संपुआ सरकारने शेतक ऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी सुमारे नऊ महिन्यांचा विलंब लावला होता. त्या तुलनेत आम्ही चार महिन्यात कर्जमाफीची पूर्तता करीत आहोत. यात होणारे आरोप खोटे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चावडी वाचन योग्य

सोमवारी, महात्मा गांधी जयंतीदिनी गावपातळीवर शेती कर्जमाफीसंदर्भात चावडी वाचन करण्याचा निर्णय घेताना त्यामागे एकही शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहू नये, सर्वानाच लाभ मिळावा, हाच एकमेव हेतू आहे. यात शेतक ऱ्यांची इभ्रत चव्हाटय़ावर आणून त्यांना अवमानित करण्याचा अजिबात हेतू नाही. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यासंदर्भात केलेला आरोप खोटा व दिशाभूल करणारा आहे, असा दावा देशमुख यांनी केला.

उडीद, मूग हमीभाव खरेदी केंद्रे उघडणार

राज्यात या वर्षी उडीद व मूगडाळीचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यास रास्त भाव मिळणे गरजेचे असल्यानेच शासनातर्फे उडीद व मूग हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार असून येत्या आठवडाभरात त्याची अंमलबजावणी अपेक्षित आहे. मूगडाळीचा हमीदर ५५७५ रुपये तर उडीद डाळीचा हमीदर ४४०० रुपये इतका राहणार आहे. यापेक्षा कमीदरात शेतकऱ्यांनी माल विकू नये आणि व्यापाऱ्यांनीही खरेदी करू नये. तसे केल्यास व्यापाऱ्यांसह संबंधित कृषिउत्पन्न बाजार समित्यांवरही कारवाई होईल, असा इशारा पणनमंत्री देशमुख यांनी दिला.