पीक विम्याची मागणी करत शेतकरी रस्त्यावर

नांदेड लातूर येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईच्या पाहणीसाठी जाताना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी मुखेडमधील काही भागात पाहणी केली. या दरम्यान सलगरा येथील शेतकऱ्यांनी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तातडीने पीक विमा मंजूर करण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती.

नांदेड ते लातूर हा रस्ता खराब असल्याने पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुखेड मार्गे लातूरला जाणे पसंत केले. या मार्गावरील काही शेतांची त्यांची पाहणी केली. मात्र, त्यांनी पाहणीसाठी कमी वेळ दिल्याने त्यांनी एक सोपस्कार पूर्ण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.  अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी होत असल्याने सरकारकडून पाहणी दौरे सुरू झाले आहेत.  कृषी मंत्री दादा भुसे यांनी अलीकडेच मुखेड भागाचा दौरा केला.  त्यांची गाडी शेतकऱ्यांनी अडवली होती. त्यामुळे वडेट्टीवार यांच्या दौऱ्यांची माहिती  प्रशासनाने जाहीर केली नाही. वडेट्टीवार नांदेड मार्गे लातूरला जाणार असल्याचे रविवारी सकाळी समजल्यानंतर पीक विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली.