शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची जाण असणारा आणि त्यांचा कैवार घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याच्या थाटात विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान केंद्रातील भाजप सरकारवर तोंडसुख घेणाऱ्या राष्ट्रवादीला शेतकऱ्यांनीही फारसे जवळ केले नसल्याचे उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवरून दिसून येत आहे.
शहरी भागात आपल्या पक्षास थारा नसल्याचे ओळखून प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ग्रामीण भागावरच अधिक भर दिला. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या शहरांमध्ये प्रमुख नेत्यांच्या प्रत्येकी एक किंवा दोन सभांचे आयोजन करणाऱ्या राष्ट्रवादीने ग्रामीण भागात मात्र प्रचाराचा बार उडवून दिला होता. त्यातही केंद्रात भाजप सरकार आल्यानंतर कांदा, कापूस, टोमॅटो आणि डाळिंब या पिकांचे घसरलेले दर या मुद्दयावर भर देण्यात आला. जिल्ह्यांप्रमाणे पिकांची वर्गवारीही करण्यात आली होती. जळगाव जिल्ह्यात कापूस आणि केळी तर धुळे व नाशिक जिल्ह्यात कापूस, कांदा, टोमॅटो आणि डाळींब उत्पादकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याने कांद्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आल्यापासून निर्यात बंदी केल्यामुळे कांदा उत्पादक देशोधडीला लागला इथपर्यंत आरोपांच्या फैरी जाहीर सभांमधून झाडण्यात आल्या. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून खा. सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत सर्वाचा समावेश होता. आपण केंद्रात कृषिमंत्री असताना सातत्याने कांदा उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्यातील सभांमध्ये आवर्जून नमूद केले होते. परंतु या आरोपांना शेतकऱ्यांनी फारसे मनावर घेतले नसल्याचे निवडणुकीच्या निकालांवरून दिसून येते. नाशिक जिल्ह्यात १५ पैकी राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या असल्या तरी त्यात उमेदवारांची व्यक्तिगत प्रतिमा अधिक कारणीभूत आहे. अन्यथा कांद्याशी संबंधित निफाड, चांदवड, मालेगावबाह्य या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला नसता. शरद पवार हे केंद्रात कृषिमंत्री असतानाही कांदा उत्पादकांना अनेक वेळा कमी भावामुळे रस्त्यावर उतरावे लागले होते हे वास्तव असल्याने कांदा उत्पादक राष्ट्रवादीच्या प्रचारास फारसा भूलला नाही. धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तर राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. जळगाव जिल्ह्यातही ११ पैकी केवळ एक जागा त्यांच्या पदरात पडली. शेतकऱ्यांसंदर्भात मांडलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीमागे केवळ नाशिकच्या बागलाण या मतदारसंघातील जनता उभी राहिल्याचे दिसून आले. नाशिकमधील बागलाण, मालेगाव या तालुक्यांमधील डाळींब उत्पादक भाव घसरल्याने हवालदिल झाल्याचे लक्षात आल्यावर सटाणा येथील सभेत खा. सुप्रिया सुळे यांनी या मुद्दय़ावर अधिक भर दिला होता. तेल्या आणि मर रोगाने थैमान घातले असताना त्यापासून पीक वाचविण्यासाठी केंद्राने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. याच सभेत निराश झालेल्या एका डाळींब उत्पादकाने तर सुप्रिया यांच्यासमोर अश्रू ढाळले होते. या दोन तालुक्यांमधील हजारो हेक्टर क्षेत्रातील डाळींब बागा तेल्या रोगाने गिळंकृत केल्याने आणि त्यातच बाजारपेठेत डाळिंबाला कवडीमोल भाव मिळत असल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली. त्यामुळे येथे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. हा एकमेव अपवाद वगळता शेतकऱ्यांचा आता राष्ट्रवादीवर विश्वास राहिला नसल्याचे दिसून येत