News Flash

अळय़ांसाठीच्या सापळय़ात शेतकऱ्यांची फसगत

कपाशीचे जवळपास ४० ते ५० टक्के नुकसान करणाऱ्या बोंडअळीवर प्रभावी औषध अद्याप आलेले नाही.

तक्रारींचा पाऊस; कृषीखातेही हवालदिल

प्रशांत देशमुख, वर्धा : विदर्भातील कापूस पिकासाठी नुकसानकारक ठरलेल्या गुलाबी बोंडअळीवर कामगंध सापळय़ाखेरीज दुसरा प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय नसल्याचे सर्वच मान्य करतात. पण, असा सापळा लावणाऱ्या शेतकऱ्यांचीच त्यात फसगत होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने कृषीखातेही हवालदिल आहे.

कपाशीचे जवळपास ४० ते ५० टक्के नुकसान करणाऱ्या बोंडअळीवर प्रभावी औषध अद्याप आलेले नाही. त्यामुळे केंद्रीय कृषी अधिकाऱ्यांसह राज्यातील कृषीखाते व कृषीतज्ज्ञ अन्य उपायांकडे वळले. त्यात कामगंध सापळे (फेरोमॅन ट्रॅप) व प्रकाश सापळे महत्त्वाचे ठरले. या सापळय़ात नरपाखरांना आकर्षित करणारा मादीचा गंध असतो. ते विशिष्ट रसायन आहे. त्याच्या वासाने आकर्षित होऊन नरपाखरे जाळय़ात अडकतात. अधिकाधिक पाखरं अडकली तर मादीशी संसर्ग टळतो. परिणामी, अंडय़ांचे प्रमाण व पुढे अळीची संख्या मंदावते. पाखरांची संख्या पाहून मग फवारणीचा निर्णय शेतकरी घेतात. किमान दहा सापळे लावण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात, पण सात ते आठच लावले जात आहेत. त्यातूनही अंदाज घेत फवारणी सुरू होते. रोगाच्या निर्मितीवर आळा घालणे व कमी प्रमाणात उद्भवल्यास फवारणी करणे, असा दुहेरी हेतू त्यात असतो. पण आता सुरक्षेची हमी देण्यात एकमेव ठरलेल्या सापळय़ांच्या उपयुक्ततेवरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सापळय़ात पतंग अडकतच नसल्याने शेतकरी रडवेले झाले आहेत. जिल्हय़ातील काही भागात हे प्रकार दिसून आले आहेत. काही प्रमाणात जिनिंग प्रेसिंग संस्थांना खर्चाचा भाग अनधिकृतपणे देण्यात आला. आर्थिक उलाढालीनुसार काहींनी हजार ते पाच हजारदरम्यान सापळे मोफत वाटले. परंतु, शासन निर्देशाचे पालन करायचे म्हणून सुमार दर्जाचे सापळे तर शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आले नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे. दुसरा उपाय प्रकाश सापळय़ांचा आहे. शेतात बल्ब लावून त्याच्या प्रकाशाखालील पिंपात पाखरं अडकवण्याचा हा उपाय आहे. स्वस्त व सोपा वाटणारा हा उपाय शेतकऱ्यांना भावत आहे, पण त्यातून फलनिष्पत्ती होत नाही. कृषी विद्यापीठाने सौर ऊर्जेवर आधारित ‘सौर कीटक सापळा’ तयार केला. या सापळय़ातून निघणाऱ्या विशिष्ट प्रकाश किडींना आकर्षित करतो. त्यामुळे किडीची पुढची पिढीच तयार होत नसल्याचा दावा करण्यात येतो, पण हे संयंत्र मर्यादित आहे.

दर्जा व प्रमाण योग्य नसल्यास निरुपयोगी

या सापळय़ांच्या किमतीबाबतही नुसताच गोंधळ सुरू आहे. काही ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये प्रति नग दराने सापळे उपलब्ध आहेत. पीसीआय (पेस्ट कंट्रोल ऑफ  इंडिया) व बुश या कंपन्याचे सापळे प्रमाणित समजले जातात. तसेच स्थानिक पातळीवर एक-दोन कंपन्या असे सापळे तयार करतात. प्रमाणित कंपन्यांचा पुरवठा तुलनेने कमी आहे. सापळय़ातील रसायन (कामगंध) महत्त्वाचे आहे. त्याचा दर्जा व प्रमाण योग्य नसल्यास सापळे निरुपयोगी ठरतात. शेतकऱ्यांना लुटण्याचा हा एक नवाच मार्ग मिळल्याचा प्रसंग पाहून सापळे विक्रीस उधाण आले आहे. या पाश्र्वभूमीवर शासनाने काही उपाय योजले. बाजार समित्यांना सवलतीच्या दरात सापळे पुरवण्याचे निर्देश मिळाले. काही बाजार समित्या वीस तर काही सतरा रुपयांत हे सापळे त्यांच्याशी संलग्न शेतकऱ्यांना देत आहेत.

सापळेच बनावट असल्याची शंका

सेलू तालुक्यातील राजेंद्र जाधव यांनी हे सापळे लावले, पण एकाही सापळय़ात नरपाखरे अडकली नाहीत. पांढऱ्या व गुलाबी बोंडअळय़ा मात्र वळवळल्यात. याच भागात आमदार डॉ. पंकज भोयर दौऱ्यावर असताना शेतकरी त्यांना शेत पाहण्यास घेऊन गेल्यावर ते सुद्धा थक्क झाले. हे सापळे बनावट असल्याच्या शेतकऱ्यांच्या शंकेवर त्यांनी कृषीखात्याला जाब विचारणार असल्याचे उत्तर दिले. बनावट सापळे विकणाऱ्या कंपन्यांचा पुरवठा बंद करण्याच्या कारवाईची शक्यताही भोयर यांनी व्यक्त केली. पं.स. सदस्य अशोक कलोडे यांनी यास दुजोरा दिला.

..तर परवाना त्वरित रद्द करू

सापळय़ांबाबत तक्रारी येत आहेत, असे जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. विद्या मानकर याविषयी म्हणाल्या. विशेषत: पोपटी रंगाच्या सापळय़ांबाबत शेतकऱ्यांचे अनुभव वाईट आहेत. त्यामुळे मी फसवणूक झाल्याची भावना असणाऱ्या शेतकऱ्यांना खरेदीच्या पावत्यासह तक्रारी मागितल्या आहेत. तपासणीअंती सापळे निकृष्ट असल्याचे सिद्ध झाल्यास कंपनीचा व दुकानदाराचा परवाना त्वरित रद्द केला जाईल. दुसरी बाब म्हणजे, हे सापळे झाडाच्या उंचीपेक्षा एक फूट अधिक उंचीवर लावल्यास परिणाम दिसतो. दोन फूट उंचीचे झाड असेल तर तीन फुटांवर सापळा लावावा, पण समान उंचीवरच सापळे लावले जात असल्याचे काही प्रमाणात दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:39 am

Web Title: farmers face problems associated with cotton production
Next Stories
1 मच्छरदाणीत शिरून बछडय़ाची दोन चिमुकल्यांसह निवांत झोप!
2 कुत्र्यांच्या हल्ल्यात आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा मृत्यू
3 गडचिरोलीच्या आठ पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक
Just Now!
X