चालू गळीत हंगामात उसाची पहिली उचल ३५०० रूपये त्वरीत जाहीर करावी. यासह विविध मागण्यांसाठी आज (गुरूवार) सहकारमंत्र्यांच्या निवासस्थानावर महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

गेल्या दहा वर्षांपासून शेतकर्‍यांना कमी दर देवून त्यांच्यावर अन्याय केला आहे. गेल्या २ ते ३ वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करावी. भाजप सरकारने ऊस दराबाबत एफआरपी जाहीर केली आहे. परंतु, राज्यातील बरेच साखर कारखाने १२ रिकव्हरी असेल तर ११ दाखवतात. त्यामुळे शासनाने यावर समिती नेमून संबंधित कारखान्यावर नियंत्रण ठेवावे. तसेच साखर घरगुती वापरासाठी २० रूपये आणि उद्योगासाठी ७० रूपये किलो असे दर सरकारने जाहीर करावे, आदी मागण्यांसाठी आंदोलक शेतकऱ्यांनी सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा नेला होता. पोलिसांनी लगेचच आंदोलकांना ताब्यात घेतले.