शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. जयंत पाटील यांच्या मालकीच्या पीएनपी कंपनीने स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. मात्र वारंवार तक्रारी करूनही जिल्हा प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याने येत्या ४ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे.  आमदार जयंत पाटील यांच्या पीएनपी कंपनीने शहाबाज ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परस्पर लाटल्या आहेत. गेली १० वर्षे बेकायदेशीरपणे कंपनीने या जागेचा वापर केला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. अखेर हताश झालेल्या शेतक ऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. शहाबाज बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ पाटील यांनी ही माहिती दिली आहे. निवासी जिल्हाधिकारी जगन्नाथ वीरकर यांची भेट घेऊन त्यांनी याबाबतचे निवेदन दिल आहे.  पीएनपी कंपनीने बळकावलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यात प्रत्येक शेतकऱ्याला दहा वर्षांसाठी एकरी दोन लाख याप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी. कंपनीविरोधात सरकारी जागेतील कांदळवनांची कत्तल केल्याविरोधात मालकांवर गुन्हा दाखल करावा. कंपनीने अतिक्रमण केलेल्या २५ हेक्टर जागा ताब्यात घेण्यात यावी, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून कंपनीने बांधलेल्या इमारती तातडीने पाडण्यात याव्यात, अशी मागणी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांवर ठोस कारवाई न झाल्यास येत्या          ४ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा द्वारकानाथ पाटील यांनी दिला आहे.