लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत चिकू फळ पिकावर हवामानाचा झालेल्या विपरीत परिणामापोटी जिल्ह्यतील ४०५७ शेतकऱ्यांना ११ कोटी ४४ लाख रुपयांची विमा भरपाई रक्कम वितरित करण्यात येणार आहे.

डहाणू तालुक्यातील कासा व सायवन, तलासरी तालुक्यातील तलासरी व झरी, वाडा तालुक्यातील कोने, कुडूस व वाडा तसेच विक्रमगड महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार तर पालघर, डहाणू, वसई व वाडा तालुक्यातील उर्वरित मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी २७ हजार रुपये या दराने विमा वितरित करण्यात येणार आहे.

पालघर जिल्ह्यत पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०१६ पासून चिकू या पिकासाठी राबविण्यात येत आहे. महावेध प्रकल्पाअंतर्गत संबंधित महसूल मंडळात उभारणी केलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रात नोंदविलेली हवामानाची प्रमाणित आकडेवारी ग्रा धरण्यात येऊन विमा संरक्षण कालावधीत सापेक्ष आद्र्रता सलग पाच दिवस ९० टक्केपेक्षा जास्त राहिल्यास व प्रति २० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास २७ हजार देय देण्यात येते. या कालावधीत सापेक्ष आद्र्रता सलग दहा दिवस ९० टक्केपेक्षा जास्त राहिल्यास, प्रति दिन २० मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ८ दिवस झाल्यास रुपये ६० हजार देय देण्यात येते. फळ पिकांना प्रतिकूल हवामान घटकांपासून विमा संरक्षण देणे आवश्यक असल्याने सन २०२० मध्ये मृग बहराकरिता फळपीक विमा योजना लागू करण्यात आली.

या योजनेमध्ये पालघर जिल्ह्यतील एकूण ४३६१ शेतकऱ्यांनी ३९३९.७३ हेक्टर क्षेत्राकरिता रक्कम रुपये १०८.३४ लाख रकमेचा विमा काढला असून त्याची विमा संरक्षित रक्कम रुपये २१६६.८५ लाख इतकी आहे. त्यापैकी ४०५७ शेतकऱ्यांना ३६५८.१२ हेक्टर क्षेत्रासाठी तालुका व महसूल मंडळनिहाय ११४४.२५ लाख रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी सांगितले.