चालू खरिपातील पीकविम्याचे प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम मुदत (३१ जुलै) जवळ येऊन ठेपल्याने विविध बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे पीकविमा भरून घेण्यासाठी २०० बँक मित्रांची मदत घेण्याची सूचना जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी केली.
जिल्हय़ातील विविध बँकांतर्गत काम करणाऱ्या बँक मित्रांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली. एका बँक मित्राने पाच गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संपर्क साधावा. या गावात बैठक घेऊन पीकविमा भरण्यासंदर्भात अडचणी जाणून घ्याव्यात. पीकविमा, तसेच पीककर्जासंदर्भातील संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज भरून घ्यावेत. तसेच शेतकऱ्यांच्या अर्जावर आधार कार्डाचा क्रमांकही टाकावा.
सध्या जिल्हय़ात पीकविमा भरण्यासाठी सर्वाधिक गर्दी जिल्हा बँकेच्या ६४ शाखांमध्ये होत आहे. पीककर्ज वाटप व मागील खरीप हंगामात मंजूर झालेल्या पीकविम्याचे वाटप करण्याची जबाबदारी असतानाच चालू खरीप हंगामासाठी पीकविमा भरून घेण्याचे कामही बँकांना करावे लागत आहे. दरम्यान, जिल्हा बँकेने पीककर्ज वाटपाचे काम थांबवून फक्त विमा हप्ते भरून घेण्याच्या कामावर भर दिला. जिल्हा अग्रणी बँक अधिकारी प्रदीप कुतूहल यांनी प्रास्ताविक केले. सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी नेमलेले बँक मित्र या बैठकीस उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा बँकेच्या मंठा शाखेत शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी मुख्य दरवाजा बंद करून खिडकीमधूनच विम्याचे हप्ते भरून घेतले. पीककर्जासाठी अजूनही शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत. परतूर तालुक्यातील आष्टी गावात महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर परिसरातील १२ गावांमधील शेतकऱ्यांनी सोमवारी उपोषण केले. या परिसरातील १४ गावे या बँकेने दत्तक घेतली आहेत. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.