अशोक तुपे

दुष्काळामुळे चारा-पाणीटंचाई निर्माण झाल्याने सरकारने छावण्या सुरू केल्या आहेत. जनावरांच्या देखभालीसाठी निम्मे कुटुंब या छावण्यांत राबत असून, छावणीतील गोठय़ांतच दुष्काळग्रस्तांनी पथारी घातल्याचे चित्र नगरमध्ये दिसते.

नगर जिल्ह्य़ातील पाथर्डी, कर्जत, जामखेड, पारनेर, शेवगाव, नगर, श्रीगोंदा या भागांत यंदा कमी पाऊस झाला. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांत पिकांना मोठा फटका बसला. दुष्काळामुळे जिल्ह्य़ातील ४५८ छावण्यांत सुमारे एक लाख ८५ हजार जनावरे दाखल झाली आहेत. त्यांची संख्या रोज वाढत आहे.

छावण्यांत जनावरे दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज करावा लागतो. त्यास मंजुरी मिळाली की जनावरे छावणीत दाखल होतात. शेतकऱ्यांनाही छावण्यांमध्ये निवारा करावा लागतो. शेडनेटचे प्लास्टिकचे हिरवे कागद, बांबू आदींद्वारे निवारा तयार करण्यात येतो. चारा वाया जाऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी लोखंडी गव्हाणी आणून बसवली आहेत. या गोठय़ातच एक लाकडी किंवा लोखंडी बाज टाकलेली असते. त्यावर शेतकरी किंवा त्यांचे कुटुंबीय आश्रय घेतात. बाजेच्या कडेला एक पिण्याच्या पाण्याची घागर, किटल्या, पशुखाद्य, जेवणाचे डबे, अंथरूण व पांघरूण असा संसार गोठय़ात असतो. निम्मे कुटुंब तिथे राबत असते. पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय आदी सुविधांची वानवा असूनही दुष्काळग्रस्त तेथे वास्तव्य करत असल्याचे पाहायला मिळते.

छोटय़ा जनावरांना साडेसात किलो, तर मोठय़ा जनावरांना १५ किलो चारा मिळतो. तो मोठय़ा संकरित गाई आणि म्हशी यांना अपुरा पडतो. त्यामुळे गावाच्या परिसरातून थोडाफार चारा आणावा लागतो. जनावरांना आणखी किमान चार किलो जादा चारा मिळाला तर अडचण येणार नाही, असे दगडवाडी (ता. पाथर्डी) येथील निवृत्ती शिंदे यांनी सांगितले. मात्र, सरकारने छावणी सुरू केल्याने शेतकरी समाधानी आहेत. या छावण्या सुरू झाल्याने पशुधन जगल्याचे पाथर्डीतील करंजी येथील राजेंद्र शिंदे, कान्होबाची वाडी येथील अमोल शिंदे यांनी सांगितले.

ऊसतोडणी मजुरांच्या जनावरांचा प्रश्न कायम

पाथर्डी, जामखेड, कर्जत तालुक्यांत ऊसतोडणी मजुरांची संख्या एक लाखाच्या घरात आहे. ते आता घरी परतू लागले आहेत. त्यांच्या ८० हजार जनावरांपैकी आणखी ५० हजार जनावरे छावणीबाहेर आहेत; पण लोकसभा निवडणूक असल्याने जनावरे दाखल करून घेतली जात नाहीत. त्यात आचारसंहिता आडवी आली आहे, असे ऊसतोडणी मजूर संघटनेचे नेते गहिनीनाथ थोरे यांनी सांगितले.

छावणीतून राजकीय बांधणी

चारा छावणी सुरू करण्यासाठी पालकमंत्री, आमदारांची शिफारस लागते. त्यामुळे बहुतेक छावण्या या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच  यांच्या आहेत. गावातील सेवा संस्था, मजूर संस्था, सामाजिक प्रतिष्ठान यांच्या नावाने त्या घेण्यात आल्या असून त्यांचे चालक पुढारी आहेत. छावण्यांसाठी अनेक अटी व शर्ती असल्याने ते मेटाकुटीला आले आहेत. उद्याची राजकीय बांधणी करण्यासाठी छावणी सुरू केली, पण आता नको वाटतेय, असे एका छावणी चालकाने सांगितले.

जाचक अटींमुळे चालक त्रस्त

छावणीत जनावरांना चारा देताना तो मोजून द्यावा लागतो. त्याचा हिशोब ठेवावा लागतो; पण चाऱ्याच्या वजनात घट येते. घट आली किंवा चारा जास्त भरला की लगेच नोटीस निघते. सीसीटीव्ही बसवावे लागतात. त्याचे रेकॉर्डिग तीन दिवसांनी सादर करावे लागते. अग्निशमन यंत्रणा, वीजजोडणी, वजनकाटा, चारा व पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करावी लागते. महावितरण लवकर वीजजोडणी देत नाही. आकडा टाकून वीज घेतली की दंड ठरलेला असतो. काही तरी उणीव शोधून नोटीस दिली जाते. सध्या लोकसभा निवडणूक असल्याने नेते, लोकप्रतिनिधी हे आधी जनावरे दाखल करून घ्या, मग कागदपत्रे पूर्ण करा, असा सल्ला देतात. त्यामुळे या जनावरांचा खर्च खिशातून करावा लागतो. छावणी सुरू करून आम्ही तर दुष्काळी बनणार नाही ना, अशी भीती चालक व्यक्त करतात.

अवकाळी पावसाची भीती

शेतात छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तेथे मुरूम नाही. अनेक ठिकाणी काळी माती आहे. निवारा चांगला नाही. त्यामुळे अवकाळी पाऊस आला तर मोठी अडचण होईल. वादळ झाले तर छावणीत तयार केलेला निवारा उडून जाईल याची भीती शेतकरी व्यक्त करतात. छावणीत शेतकऱ्यांना दूध मिळते, तर शेण चालकांना मिळते. शेणातील किडे व गोचीड खाण्यासाठी बगळे, कावळे तसेच अनेक पक्षी तेथे येतात. दुष्काळात छावणीच्या आश्रयाला पक्षीही आलेले दिसतात.

वृद्धांकडूनही मदत

छावणीत राहणारे तरुण पहाटे ५ वाजता दूध काढून ते डेअरीला पोहोचवून घरी जातात. नंतर वडिलांचे जेवण पोहोच करून मिळेल तेथून थोडाफार चारा आणतात. मात्र, वृद्ध मंडळी दिवसभर छावणीत असल्याचे चित्र दिसते. दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी ते कुटुंबाला मदत करीत आहेत. परीक्षा संपल्याने अनेक विद्यार्थीही छावणीत आजोबांसोबत दिसतात. यूटय़ूबवर एखादे कीर्तन ते आजोबांना ऐकवतात.