विदर्भात यंदा सरासरीच्या ७५ टक्के पाऊस  झाला असून सध्या सिंचन प्रकल्पात ७९ टक्के साठा आहे. पावसाच्या व्यस्त प्रमाणामुळे खरीप हंगामात पीक उत्पादनाला फटका बसला, पण जलसाठय़ांची समाधानकारक स्थिती पाहता शेतक ऱ्यांना रब्बी हंगामाची आशा आहे. खरीप हंगामात पाऊस लांबल्याने पेरणी उशिरा झाल्याचा फटका शेतक ऱ्यांना बसला, तसेच गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्यानेही पिकांच्या झडतीत घट झाल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषत: सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या आणि कापूस फुटण्याच्या स्थितीत असताना पाऊस न आल्याने विदर्भातील या दोन पिकांना मोठा फटका बसला. तूर पिकाचीही स्थिती तशीच आहे.

दिवाळी, भाऊबीज आटोपल्यानंतरच शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागणार आहे. विदर्भात सिंचनाच्या पुरेशा सोयी नसल्यामुळे हरभरा पिकाकडेच शेतक ऱ्यांचा कल आहे. नागपूर विभागाचे रब्बी पिकांचे क्षेत्र ४ लाख १३ हजार हेक्टर, तर अमरावती विभागाचे ५ लाख ९२ हजार हेक्टर आहे. यात प्रामुख्याने हरभरा, गहू, जवस, ज्वारी, करडी, सूर्यफूल ही पिके घेतली जातात. नागपूर विभागात हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र दीड लाख हेक्टर, अमरावती विभागात साडेतीन लाख हेक्टर आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे तेच शेतकरी गव्हाची पेरणी करतील. गव्हाचे क्षेत्र विदर्भात साडेतीन लाख हेक्टर आहे. हरभरा व गहू या पिकांबाबत शेतक ऱ्यांना अधिक आशा आहे.

नागपूर विभागातील रब्बी पिकांचे क्षेत्र वाढविण्याच्या सूचना राज्याच्या कृषी विभागाचे मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. विदर्भात खरीप हंगामात कापसाचे क्षेत्र वाढले आणि सोयाबीनचे कमी झाले. बहुतांश शेतकरी सोयाबीन निघाल्यानंतर हरभऱ्याची लागवड करतात. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात रब्बीची पेरणी सुरू होण्याची आशा आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने रब्बी हंगामासाठी १८ हजार क्विंटल हरभरा व तेवढय़ाच गव्हाच्या बियाण्यांचा साठा उपलब्ध करून दिला आहे. हरभऱ्यात विजय, जॉकी, दिग्विजय, विशाल व आयसीसी ३६, तर गव्हामध्ये लोकवन, जीडब्ल्यू-४९६, एचडी-२१८९, शक्ती, चंदोसी हे वाण उपलब्ध केले आहे. विदर्भात रब्बी हंगामात तेलबिया पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणांची निर्मिती केली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने अवर्षण स्थितीत येणाऱ्या विविध तेलबिया पिकांच्या वाणासह करडीची शिफारस कृषी विद्यापीठाने केली आहे. विदर्भात प्रकल्पांमध्ये ७९ टक्के जलसाठा आहे. अमरावती विभागातील ७ व नागपूर विभागातील १३ मोठय़ा प्रकल्पांतील जलसाठय़ाची स्थिती समाधानकारक आहे. अमरावती विभागातील उध्र्व वर्धा, पूस, अरुणावती, बेंबळा, वाण, नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा आणि नागपूर विभागातील तोतलाडोह, कामठी खैरी, पेंच रामटेक, निम्न वेणा (नांद), वाघ शिरपूर, बोर, दिना, धाम, पोथरा, लोअर वर्धा व गोसीखुर्द या प्रकल्पांमध्ये ७० टक्क्यांवर साठा आहे.