मालाला भाव नसल्याने पिकाची नासाडी; दलालांच्या मध्यस्थीमुळे शेतकरी मेटाकुटीला

विरार :  आधीच हवामानाच्या लहरी पानाचा फटका झेलणाऱ्या शेतकऱ्यांना करोना वैश्विक महासाथीने पूर्णत: होरपळून टाकले. त्यात आता दलालांचा जाच सहन करावा लागत आहे. यामुळे मालाला हवा तसा भाव मिळत नसल्याने विरारमधील शेतकऱ्यांनी शेतातच आपले उत्पादन नष्ट करायला लावले आहे. यात विरारमधील टोमॅटोची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी हजारो किलो टोमॅटो शेतात पुरून टाकले.

वसई पूर्वेकडील ग्रामीण भागातील थळ्याचा पाडा, आडणे, भाताणे, कळभोण, शिरवली येथे टोमॅटोचं मोठय़ा प्रमाणात पीक घेतले जाते. या वर्षीसुद्धा हवानाचा लहरीपणा असला पीक मात्र चांगले आले होते. पण या वर्षी करोनाचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी दर कमी करत अल्प दरात मालाची खरेदी चालवली आहे. यामळे शेतकऱ्यांची लागतसुद्धा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे बाजारात टोमॅटोचे भाव चढताना दिसत आहेत. पण त्याचा शेतकऱ्याला कोणताही फायदा मिळत नाही.  यामुळे दलाल तुपाशी शेतकरी उपाशी अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. लाखो रुपये खर्च करून केलेला भाजीपाल्याला कवडीचा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

देशासह राज्यात करोनाने थैमान घातले कोरोनामुळेदेखील शेतकऱ्यांचे देखील मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेली टाळेबंदी ही शेतकऱ्यांच्या जणू मुळावरच उठला आहे. पालघर तालुक्यातील थळ्याचा पाडा येथील महिला शेतकरी सुगंधा जाधव यांनी एका एकरात टोमॅटोचे पीक घेतले. मात्र टाळेबंदीच्या काळात विक्री अभावी सर्व माल जाग्यावरच सडून गेला. त्यामुळे शेतकऱ्याचे एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ५ लाखांचे नुकसान झाले असे त्यांनी सांगितले.

सध्या व्यापारी उच्च दर्जाचा माल ३२ किलो, कॅरेटप्रमाणे २०० तर कमी दर्जाच्या मालाचे केवळ १०० रुपये देत आहेत. हा भाव गेल्या वर्षी पेक्षा २०० ते ३०० रुपयांनी कमी आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन केवळ व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे.

खाऱ्या पाण्यामुळे आणि हवामानात बदल झाल्याने टोमॅटो आणि पालेभाज्या यांना कीड लागली त्यामुळे अन्य पालेभाज्यांचेदेखील मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले त्यातच बाजारभाव करणारे मध्यस्थी आम्हाला योग्य तो भाव मिळवून देत नसल्याने आमची हिंमत खचली आहे.

–  सुगंधा जाधव, महिला शेतकरी, विरार