रस्ते, सोसायटी येथे फिरून भाजीपाला विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश, पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले असल्याने पश्चिम महाराष्ट्रातून पुणे येथे भाजीपाला, फळे विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

पुणे शहरांमध्ये करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्त्यावर शेतमाल विकणाऱ्या विक्रेत्यांवर, तसेच शेतमालाची वाहतूक करणार्‍या शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त गायकवाड यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातून पुणे येथे शेतमाल विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरलेली आहे. या शेतकऱ्यांवर पुण्यासारखी मोठी बाजारपेठ गमावण्याची वेळ आली आहे.

याबाबत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक देश एक बाजार’ अशी भूमिका घेतली असल्याने शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल देशात कोठेही विकता येतो. तसेच व्यापाऱ्यांनाही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कुठूनही शेतमाल खरेदी करता येते. बाजार समितीची मक्तेदारी मोडून काढण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. अशावेळी आयुक्त गायकवाड यांनी घेतलेली भूमिका ही एकांगी स्वरूपाची आहे.

आयुक्तांनी फेरविचार करावा –

फेब्रुवारी महिन्यात करोनाचा संसर्ग पसरू लागला. तेव्हा शेतकऱ्यांनी शहरांमध्ये, महानगरांमध्ये जाऊन ताजा भाजीपाला घरोघरी पोहोचवण्याचे काम केले. बाजार समिती, महापालिकेची मंडई बंद असताना शेतकऱ्यांनी जीव धोक्यात घालून शेतमाल पुरवला. आता मात्र या शेतकऱ्यांवर बंधने घातली गेली आहेत. त्यांना रस्ते, सेवा सोसायटी सोसायटी येथे शेतमाल विकण्यास मज्जाव केला आहे. तसेच किरकोळ कारणे काढून त्यांच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. हा निर्णय चुकीचा आहे. याचा आयुक्त गायकवाड यांनी फेरविचार करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.