दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ७ हजार कोटींची मदत केली. केंद्राकडील निधीची वाट न पाहता राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. लवकरच दुसऱ्या हप्त्याची रक्कम दिली जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. बँकेचेच नव्हे, तर सावकाराचे कर्जदेखील फेडण्याची सरकारची तयारी असून, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
औंढा नागनाथ येथे आले असता पत्रकारांशी दानवे बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, कैलास काबरा, सर्जेराव िदडे, नारायणराव सोळंके, मनोज शर्मा, शरद पाटील आदींची उपस्थिती होती. मराठवाडय़ात अत्यल्प पाऊस झाल्याने ५० टक्क्य़ांपेक्षा कमी पसेवारी आली. दुष्काळी स्थितीत शेतकरी होरपळत असल्याने केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली. केंद्र सरकारचे पथक नुकसानीची पाहणी करून परत जाते न जाते तोच राज्यात पुन्हा गारपीट व अवकाळी पाऊस झाला. सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे दानवे म्हणाले.
दुष्काळी स्थितीवर निधीचे वाटप होते न होते तोच अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची कबुली देऊन त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने ७ हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पहिल्या हप्त्याचे वाटप झाले. आता दुसरा हप्ता वाटप करण्यासाठी केंद्राची मदत मागितली आहे. केंद्राकडून मदत मिळाली नाही, तरीही राज्य सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. शेतकऱ्यांनी संकटाचे धर्याने सामना करावा, असे आवाहनही त्यांनी केले.