केंद्र व राज्य शासनाने गारपीटग्रस्तांना ठोस मदत केली नाही. संकटाच्या काळात त्यांना वाऱ्यावर सोडले. सर्वाधिक विदेश दौरे केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. पण, त्यांच्या धोरणात शेतकरी कुठेच दिसत नसल्याचा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लगावला. शेती आणि शेतकऱ्यांना दुय्यमस्थानी ठेवण्याचे भाजप सरकारचे धोरण भविष्याच्या दृष्टिकोनातून चांगले लक्षण नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे जैतापूर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे असा सल्ला पवार यांनी दिला.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले लिखित ‘थोडी ओली पाने’ या कथासंग्रहाचे प्रकाशन तसेच जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन, जिल्हा क्रीडा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धैर्यशीलराव पवार यांचे पंडित नेहरू यांच्यासमवेत असलेल्या छायाचित्राचे अनावरण, बॉलिंग मशीनचे उद्घाटन असे कार्यक्रम झाले. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी टोलबंदीच्या निर्णयावरून राज्य शासनावर टिकास्त्र सोडले. राज्य शासनाने १२ टोलनाके बंद करत ५३ नाक्यांवर कार, एसटी आणि शाळा बसला टोल माफ करण्याचा निर्णय घेतला. सवंग लोकप्रियतेसाठी तो निर्णय घेण्यात आला. विकासासाठी चांगले रस्ते आवश्यक बाब असून शासनाच्या निर्णयाचे राज्यातील रस्ते विकास कार्यक्रमांवर दूरगामी परिणाम होणार आहेत. जैतापूर ऊर्जा प्रकल्पाला भाजपचा पाठिंबा आहे तर शिवसेनेचा विरोध आहे. या प्रकल्पाद्वारे तुलनेत कमी दरात वीज उपलब्ध होईल. ही वीज राज्यासाठी आवश्यक असून त्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे. सत्ताधारी भाजपचा निर्णय शिवसेनेला अमान्य असल्यास त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे असे पवार यांनी सांगितले. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीविषयी त्यांनी नागपूरच्या ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर बोट ठेवले. मुख्यमंत्र्यांच्या शहरात वाढती गुन्हेगारी चिंतेची बाब आहे. शितावरून भाताची परीक्षा करता येईल असे सांगत गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात शासन अपयशी ठरल्याचे नमूद केले.