पंतप्रधानांची भेट घेण्याची शरद पवार यांची ग्वाही  

उस्मानाबाद : अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान मोठे आहे. त्यासाठी राज्य सरकार मदत करीलच, पण भरीव मदतीसाठी आपण खासदारांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सांगितले.

पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. जनावरे दगावली आणि घरांची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली आहे. राज्य सरकार मदत करील, पण काही मर्यादा आहेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

अतिवृष्टीग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्य़ातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी पवार आले होते. लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील शेतकऱ्यांशी पवार यांनी संवाद साधला. ‘‘भूकंपासारख्या संकटाला आपण सर्वानी मोठय़ा धीराने तोंड दिले आहे. अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानही मोठे आहे. त्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करणे आवश्यक आहे. मात्र, मदत करण्यासाठी राज्य सरकारला मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी खासदारांसह पंतप्रधांनाची भेट घेण्यात येईल’’, असे पवार म्हणाले.

पवार यांनी तुळजापूर येथून पाहणीच्या दौऱ्याची सुरुवात केली. तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, लोहारा तालुक्यातील सास्तूर या दरम्यान ठिकठिकाणी थांबून त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. रब्बीच्या पेरणीपूर्वी पंचनामे करून आर्थिक मदत द्या, अशी विनंती शेतकऱ्यांनी पवार यांना केली. त्यावर पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती द्या, असे पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

पवार यांच्याबरोबर खासदार ओम राजेनिंबाळकर तसेच जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचा अंदाज आणि पीक विमा यांची माहिती पवार यांना दिली.

आज फडणवीसही दौऱ्यावर

शरद पवार यांच्या पाठोपाठ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी रविवारी तुळजापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांची भेट घेतली.