मोहन अटाळकर, अमरावती

विदर्भात काही ठिकाणी कापूस वेचणीला सुरवात होऊन शेतकऱ्यांनी विक्रीही चालू केली आहे. मात्र, सीसीआयची कापूस खरेदी अजूनही सुरू झालेली नाही. कापसाचा हमीभाव ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटल आहे. आवक कमी असल्यामुळे सध्याचे दर ५६०० ते ६००० रुपये म्हणजे हमीभावापेक्षा अधिक आहेत. पण, त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता धूसर बनली आहे. कोरडवाहू कापूस कमी पावसामुळे जवळपास उध्वस्त झाल्यात जमा आहे. परतीच्या पावसाच्या आशाही मावळल्याने कापसाच्या स्थितीत काही सुधारणा होईल, याची शाश्वती नाही. गेल्या वर्षी बोंडअळीने पोळलेल्या कापूस उत्पादकांना यंदाही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

गेल्या वर्षीच्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा उद्रेक होऊन कापसाच्या उत्पादकतेत मोठी घट झाली होती. या वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव फारसा पुढे आलेला नाही. पण, पाच टक्के गावांमध्ये बोंड अळीने नुकसान केलेच आहे.

गेल्या वर्षी अनेक शेतकऱ्यांनी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात रासायनिक खताचा वापर केला, त्यामुळे  कोरडवाहू क्षेत्रात आलेली कपाशीची बोंडे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुटली. शेतकऱ्यांना पहिला व दुसरा वेचा चांगला आला, मात्र या वर्षी सरसकट कापसाचे पीक करपत आहे. नापिकीची ही चिन्हे आहेत. विदर्भातील कोरडवाहू क्षेत्रात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा ६० टक्क्यांहून अधिक नुकसान होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सर्वच भागांतून कापसाची आवक मोठय़ा प्रमाणात घटली आहे. बहुतेक शेतकऱ्यांनी कापसाचे पीक नष्ट करून गहू-हरभऱ्याची पेरणी सुरू केली आहे. या खरीप हंगामात  सुरवातीला ३५० ते ४०० लाख क्विंटल कापसाचे विक्रमी उत्पादन राज्यात होईल, असे सांगण्यात येत होते, मात्र पावसाने दगा दिल्याने कापसाचे उत्पादन १८० लाख क्विंटलच्या आसपास राहील, असा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे शेतकऱ्यांचे किमान आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार अशी भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जागतिक कापूस उत्पादन, जागतिक बाजारपेठेतील कापसाचे दर, कापसाची होणारी आयात-निर्यात यावरही भारतातील कापसाचे दर अवलंबून असतात. कापूस उत्पादक प्रमुख देशांत वाढलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे जागतिक कापूस उत्पादनही घटण्याचा अंदाज आहे. सध्याचे जागतिक बाजारातील कापसाचे दर देशांतर्गत बाजारातील दरापेक्षा अधिक आहेत. व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जादा देऊन कापसाची खरेदी सुरू केली आहे. पण, कापसाची उत्पादकता घटणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा काहीच लाभ मिळणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

या वर्षी मात्र पावसाने दिलेला मोठा खंड, वातावरणातील बदल, रासायनिक शेतीने जैविक तत्वे गमावलेली जमीन, बीटी बियाणांच्या मर्यादा यामुळे या दशकातील सर्वात कमी कापसाचे पीक कोरडवाहू क्षेत्रात होईल, असे संकेत मिळत आहेत. कापसाचे एकरी उत्पादन सरासरी २ ते ३ क्विंटल राहण्याचा अंदाज आहे. कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. संपूर्ण विदर्भात कोरडवाहू कपाशीला मोठा फटका बसला आहे.

विदर्भातील एकाही जिल्ह्याने पावसाची सरासरी गाठलेली नाही. बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यात तर सरासरीच्या ५० ते ७५ टक्केच पाऊस झाला आहे. उर्वरित नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे ७५ ते १०० टक्क्यांदरम्यान आहे.  पावसाचा मोठा खंड व परतीच्या पावसाअभावी कोरडवाहू कपाशीला मोठा फटका बसला आहे. अनेक भागांत कोरडवाहू कपाशीचा हंगाम येत्या महिनाभरातच पूर्ण होतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. कोरडवाहू कपाशीचे उभे पीक आता सुकलेले दिसत असून, झाडांवर लागलेल्या बोंडांमधून कापूस उमलत आहे. या कापसाची वेचणी झाल्यानंतर अनेक शेतांमधील कपाशीचे पीक काढून टाकण्यायोग्य होईल, अशी स्थिती आहे. विदर्भात एकूण लागवडीच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र हे कोरडवाहू कपाशीचे आहे.

विदर्भात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने कपाशीच्या वाढीवर परिणाम झाला. पीक फारसे जोमदार वाढले नाही. शिवाय फूल, पात्या धरण्याच्या, बोंड परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाऊस, ओलावा नसल्याने सर्वाधिक फटका बसला. गेल्या काही दिवसांत हलक्या जमिनीतील पीक दिवसा सुकल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची अपेक्षा होती. मात्र, कुठेच हा पाऊस बरसला नाही.

शेतकऱ्यांना कोरडवाहू कापूस उत्पादनातून उत्पादन खर्च मिळेल, अशी शक्यता दिसत नाही. सध्या लागलेल्या बोंडांमधील कापसाची वेचणी केल्यानंतर हे पीक पूर्णत: खाली होईल, अशी स्थिती आहे. ही सर्व लक्षणे कपाशीचा हंगाम लवकरच संपण्याच्या दिशेने निर्देश करीत आहेत.

दर वर्षी हिवाळ्यात कोरडवाहू कपाशी पिकाच्या स्थितीत सुधारणा होऊन शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन होत असते. यंदा मात्र गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून पिकाला हवे असलेले पाणी, ओलावा नसल्याने उभे पीक कोमेजत आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळण्याची शक्यता नाही, असे जाणकारांचे मत आहे.

नापिकीच्या संकटाचे निवारण करण्यासाठी आपण कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांना अहवाल सादर केला आहे. कापूस उत्पादक क्षेत्रात झालेला वातावरणीय बदल, रासायनिक शेतीने जैविक तत्त्वे गमावलेली जमीन, निकामी झालेले बीटी बियाणांचे तंत्रज्ञान नापिकीसाठी जबाबदार असून जमिनीमध्ये ओलावा राखण्यासाठी सेंद्रीय शक्तीच्या क्षमतेची पुनस्र्थापना यावर आपण भर दिला आहे. भारतातील देशी कापसाच्या बियाणाच्या जागी आणलेले संकरित कापसाचे बियाणेच मूळ कारण आहे. आता बीटी कापसाचे ‘बोंटअळीरक्षक बोलगार्ड’ हे तंत्र अळी मारण्यास पूर्णपणे अयशस्वी होत आहे. विदर्भात कमी पाण्याचे  कापसाचे सरळ वाण, तूर, ज्वारी अशा अन्न जातीय पिकांना थेट नगदी अनुदान देण्याची उपाययोजना करावी, अशी मागणी आपण कृषिमंत्र्यांकडे केली आहे.

किशोर तिवारी, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन