किसान क्रांतीच्या संयोजकांनी संप मागे घेतल्याचे जाहीर केल्यानंतर आज, शनिवारी त्याच्या जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शेतकरी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा बैठका घेऊन संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबईतील निर्णयानंतर आज जिल्ह्यात दूध संकलन सुरळीत सुरू झाले. मात्र बाजार समित्यांमधील आवक ठप्पच होती. संप सुरूच ठेवण्यासाठी नगर शहरालगत मनमाड रस्त्यावर विविध संघटनांनी एकत्र येत रास्ता रोको आंदोलन केले. कर्जत येथे किसान क्रांतीचे जयाजी सूर्यवंशी व मंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

किसान क्रांतीच्या संयोजकांची काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. रात्री २ नंतर लोकांना त्याची माहिती मिळाली. मात्र संयोजन समितीतील जिल्ह्य़ातील डॉ. अजित नवले हे बैठकीतून निघून तर आलेच पण त्यांनी संप सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे संपाच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. संयोजन समितीतील अनिल धनवट, सुहास वहाडणे, धनंजय धोर्डे हे मुंबईच्या बैठकीला गेलेच नव्हते. तर धनंजय जाधव हे मुंबईहून कुठे गेले हे माहीत नव्हते. संयोजन समितीतच एकसंधता राहिली नाही. त्यामुळे आता पुणतांबे हे संपाचे केंद्र राहिलेले नाही.

पूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर डॉ. धनंजय धनवटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संप मागे घेतला होता. पण त्यांनी आता तो सुरू केल्याचे जाहीर केले. संपाच्या निमित्ताने पुणतांबे येथील राजकीय गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. आज श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृहावर शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक होऊन संप सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला. आज जिल्ह्य़ातील सर्व दूध संस्थांनी सकाळी संकलन केले. मात्र काल रात्री अनेक संस्थांच्या टँकरमधील दूध ओतून देण्यात आले. बाजार समित्यांचे कामकाज सुरू करण्यात आले असले, तरी शेतकऱ्यांनी आज भाजीपाला आणला नव्हता.

कर्जतमध्ये आंदोलन सुरूच

तालुक्यात आजही दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचे आंदोलन शेतक ऱ्यांनी केले. संप अचानक मागे घेण्यात आल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी आज अशोक जगताप आणि लालासाहेब सुद्रीक यांच्या नेतृत्वाखाली राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जयाजी सूर्यवंशी यांच्या पुतळ्याचे दहन केले. या वेळी ‘शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्यांचा निषेध,’ अशा घोषणा देण्यात आल्या. संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करा आणि शेतमालास हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करा यासह इतर मागण्यांसाठी सुरू झालेल्या संपात तालुक्यातील शेतकरी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. दूध, भाजीपाला बाहेर काढला नाही, दुधाचा खवा बनवला तर काही शेतकऱ्यांनी दूध फेकून दिले तसेच भाजीपाला पण शेतातच सोडला, फळे सुकली अशा प्रकारे शेतकऱ्यांनी स्वत:चे नुकसान सहन केले, मात्र ठाम राहिले. तीन दिवसांत  सुमारे ५ कोटी रु पयापेक्षा जास्त नुकसान तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहन केले, असे असतानाही काही जणांनी एकतर्फी आंदोलन मागे घेतल्यामुळे संताप आणि निषेध व्यक्त होत आहे. अशोक जगताप यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील असे सांगितले.

किसान सभा संप सुरूच ठेवणार

शेतकऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा हा विश्वासघात असल्याची टीका मार्क्‍सवादी किसान सभेचे राज्यसचिव डॉ. अजित नवले यांनी केली. किसान सभेला झालेली तोडजोड मान्य नसून संप सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. किसान क्रांती मोर्चाची कोअर कमेटी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काल रात्री झालेल्या बैठकीला डॉ. नवले हजर होते. मुख्यमंत्र्यांनी चर्चेत कोणाचे किती मर्यादेपर्यंत कर्ज माफ करणार हे स्पष्ट करण्यास नकार दिला. याबाबत समिती स्थापन करून पुढील चार महिन्यांत हे स्पष्ट करू असे सांगितले. कर्जमाफी झालेली नाही. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना गाजर दाखविले गेले आहे. स्वामिनाथन समितीची उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या आधारावर किमान आधारभूत भाव देण्याची शिफारस वा तिच्या अन्य कोणत्याही शिफारशी मान्य करण्यात आलेल्या नाहीत. शेतकऱ्यांना पेन्शन देणे शक्य नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दुधाच्या भाववाढीचे गाजर बेभरवशाचे आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर संप मागे घेऊ नका अशी मी शिष्टमंडळातील सर्व सदस्यांना वारंवार विनंती करत होतो. आपण पुणतांब्याला ग्रामसभा घेऊ व त्यात निर्णय घेऊ अशी विनंती केली. संपाला पाठिंबा देणाऱ्या सर्व शेतकरी नेत्यांना व संघटनांना विश्वासात घ्या असे सांगितले. मात्र मुख्यमंत्री, सदाभाऊ खोत व शिष्टमंडळामध्ये अगोदरच सर्व ठरले असल्याची जाणीव बैठकीमध्ये होत होती. त्यामुळे माझे कोणीही ऐकले नाही. किसान सभेचे केंद्रीय सहसचिव डॉ. अशोक ढवळे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून मी वर्षां बंगल्यातून बाहेर पडलो. त्यानंतर शिष्टमंडळ व मुख्यमंत्र्यांनी संप मागे घेतल्याचे संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. मी त्या पत्रकार परिषदेत सामील झालो नाही. काहीच पदरात पडले नसल्यामुळे संप मागे घेऊ नये तो सुरूच ठेवावा यावर किसान सभा ठाम असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर बंद

श्रीरामपूर येथे व्यापारी संघटनेने आज शहर बंदचे आयोजन केले होते. संप मागे घेतल्याचे वृत्त येऊनही बंद पाळण्यात आला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमण मुथ्था यांनी हे आवाहन केले होते. वाकडी येथे आजही संप सुरूच होता. राहुरी, मानोरी आदी भागांत संप सुरूच ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. ब्राह्मणी येथील स्मशानभूमीत शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यातील तिघांची प्रकृती आज बिघडली. त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. पाटेवाडी (ता. कर्जत), चेडगाव (ता. राहुरी), हरेगाव (ता. श्रीरामपूर), वडगावपान, मांडवे (ता. संगमनेर) येथे दुधाच्या टँकरमधील दूध सांडून देण्यात आले. चेडगाव येथील प्रभात दूधचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर कुऱ्हे यांना आंदोलकांनी मारहाण केली.