राज्यभरात शंभर शेतकरी संघटना; व्यक्तिस्तोम वाढविण्यासाठी संघटनांचा आधार

राज्यात १९८०च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकरी आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली. छातीवर शेतकरी संघटनेचा लालबिल्ला मोठय़ा गर्वाने लावून तो मिरविणारा हा कार्यकर्ता शेतीचे अर्थशात्र आकडेवारीसह मांडू लागला. त्यातून वैचारिक भूमिका असलेले कार्यकर्त्यांची फळी तयार झाली. पण संघटनेत फूट पडून अनेक वष्रे झाली. आता मात्र परिस्थिती बदलली असून शेतकरी संघटनांचे उदंड पीक फोफावले आहे.

भीक नको, हवे घामाचे दाम, उणे सबसिडी आदी अर्थशात्र मांडत शरद जोशी  कांदा, ऊस, कापूस यांची आंदोलने केली. वैयक्तिक अर्थकारणाला महत्त्व दिले नाही. पण त्यांच्या अखेरच्या कालखंडात प्रकृतीच्या कारणामुळे अनेक जणांमध्ये अंतर्गत मतभेद झाले. त्यातून शेतकरी संघटनांच्या सवत्या सुभ्यांना सुरुवात झाली. आज तर कोणीही उठतो, अन् शेतकरी संघटना काढतो. काही सरकार पुरस्कृत तर काही नेते पुरस्कृत. काही संघटना मिरविण्यासाठी काढण्यात आल्या आहेत. एक ना अनेक तऱ्हा असलेल्या सुमारे शंभर संघटना राज्यात अस्तित्वात आल्या आहेत.

शरद जोशींबरोबर १९८०च्या दशकात अनेक सहकारी होते. चळवळीत त्यांनी रघुनाथदादा पाटील, अमर हबीब, खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, लक्ष्मण वडले, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, बबनराव काळे यांच्यासह अनेक तरुणांना सामील करून घेतले, पण पुढे सर्वात प्रथम विजय जावंधिया बाहेर पडले. त्यांचा खुल्या धोरणाला विरोध होता. वैचारिक मतभेद दोघांत झाले. तसेच माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्याशी जोशी यांची मत्री होती. त्यांनी राज्यसभेकरिता पंजाबचे भूपेंद्रसिंग मान व प्रकाश आंबेडकरांची नावे सुचविली. जावंधियांचा विचार केला नाही असा समज झाल्याने त्यांनी बाहेर पडून वेगळी चूल मांडली. त्यानंतर २००४मध्ये  दुसरी फूट स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना खासदार राजू शेट्टी यांनी करून केली. पुढे २००७-०८ मध्ये रघुनाथदादा पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांचे मतभेद झाल्याने त्यांनी संघटना स्थापन केली. तर सध्या अनिल धनवट अध्यक्ष असलेली शेतकरी संघटना ही मूळ संघटना असल्याचा दावा केला जातो. या प्रवाहातील तीन मुख्य संघटना असून आता संघटनांचे भुईछत्राप्रमाणे पीक आले आहे. शेतकरी संपानंतर तर त्याने बाळसे धरले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून फुटून संजय घाटनेकर यांची बळीराजा संघटना व कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेली रयतक्रांती संघटना या दोन संघटना तयार झाल्या. त्याखेरीज डॉ. बुधाजीराव मुळीक यांची भुमाता, तृप्ती देसाई यांची भूमाता महिला ब्रिगेड, विठ्ठल पवार यांची शेतकरी संघटना, गणेश जगताप यांचा बळीराजा संघ, किशोर ढमाले यांची सत्यशोधक कष्टकरी संघटना, आमदार बच्चू कडू यांची प्रहार, प्रतिभा शिंदे, प्रा. सुशीला मोराळे, किशोर तिवारी यांच्या तसेच अंकुश जनहित, बळीराजा आक्रोश, शेतकरी संग्राम, भूमिपुत्र संघर्ष वाहिनी, बळीराजा संघ, संभाजी ब्रिगेड शेतकरी संघटना, क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेड या नावांच्यादेखील शेतकरी संघटना आहेत. त्याखेरीज तालुका पातळीवर अनेक संघटना आहेत.

गेल्या काही वर्षांत शेती क्षेत्रात मोठे प्रश्न तयार झाले आहेत. त्यात शेतीत पदवीधर तरुण काम करू लागला असून त्याला लुटीचे अर्थशात्र समजू लागले आहे. तो प्रश्नाबाबत सजग आहे. त्यामुळे चळवळीत तो थेट सामील होतो.

शेतकरी नेते पंजाबराव देशमुख यांची खुप जुनी कृषक संघटना असून त्यानंतर माजी मंत्री गोिवदराव आदिक यांनी दुसरी कृषक संघटना उभी केली होती. त्याखेरीज सर्वच राजकीय पक्षांशी संबंधित शेतकरी संघटना आहेत, युवा आघाडय़ा आहेत. शेतकरी संपाच्या वेळी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. या समितीत सुमारे ३३ शेतकरी संघटना सामील आहेत.

सरकार कुठल्याही पक्षाचे असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नात फूट पाडण्यासाठी असा उद्योग करते. पणन राज्यमंत्री खोत, पाशा पटेल, गोटे, खासदार शेट्टी हे त्याची उत्तम उदाहरणे आहेत. सत्ताधाऱ्यांची फूस मिळाल्याने संघटनांचे पेव फुटले असले तरी त्यांना शेतकऱ्यांची मान्यता नाही. स्वतचे स्थानिक राजकारणात उपद्रवमूल्य वाढविण्याकरिता संघटना स्थापन केल्या जातात.   – कालिदास आपेट, कार्याध्यक्ष, शेतकरी संघटना.   (रघुनाथदादा पाटील प्रणीत)

शेतकरी संघटना या नावाला जसे महत्त्व आहे, तसे संघटनेच्या बिल्ल्यालाही महत्त्व आहे. त्याचा वापर काही मोजकी माणसे करतात. बाकी हौशा, गवशा, नवशांनी संघटना या लेटरहेडपुरत्या काढल्या आहेत. शरद जोशींसारखा नेता नसल्याने आज ही वेळ आली. किमान आज ज्या प्रमुख संघटना आहेत, त्या तयारच होणार नाही असे नेतृत्व दुर्दैवाने आज नाही. संघटना कितीही झाल्या तरी जोशी यांचीच वैचारिक मांडणी त्यांचे नेते करतात. बोगस संघटना या व्यक्तिस्तोमाकरिता आहे.  – अजित नरदे, प्रमुख नेते, शेतकरी संघटना (शरद जोशीप्रणीत)