यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या अन्य भागाप्रमाणेच कोकणातील रायगड व रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांवर मोदी लाटेचा प्रभाव राहिला, हे खरं असलं तरी स्थानिक राजकीय समीकरणांचाही येथील निवडणूक निकालांवर परिणाम झाला, हे स्पष्ट आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे खासदार अनंत गीते यांच्यासमोर या वेळी काँग्रेस आघाडीतर्फे ज्येष्ठ मंत्री सुनील तटकरे यांना उतरवण्यात आलं. त्यामुळे गीते यांच्या यशाची वाट बिकट झाली. त्यातच गेल्या निवडणुकीत महायुतीचा सहकारी राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाने(शेकाप)राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात शेकापची सुमारे पावणेदोन लाख मतं आहेत, असं मानलं जातं. अशा परिस्थितीत गीतेंना विजयासाठी मोठे परिश्रम करणं अपरिहार्य ठरलं. उत्तम संघटनकौशल्य व आर्थिक ताकद या तटकरेंच्या आणखी दोन महत्त्वाच्या जमेच्या बाजू होत्या. पण लोकसभा निवडणुका लढवण्याच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर गीतेंनी गाव आणि वाडय़ा-वस्त्यांवर प्रचाराचं तंत्र अवलंबलं. त्याचबरोबर सुनील तटकरे याच नावाचा आणखी एक अपक्ष उमेदवार आणि मुझफ्फर जैनुद्दीन चौधरी या अन्य अपक्ष उमेदवाराने खाल्लेली प्रत्येकी नऊ हजार मतं तटकरेंना महागात पडली.
या निवडणुकीत गीतेंनी निसटता विजय मिळवला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीतही इथे काँग्रेस आघाडी, महायुती आणि शेकाप यांच्यात तिरंगी लढती अपरिहार्य दिसत आहेत. त्यामध्ये महायुतीशी काडीमोड घेतलेल्या शेकाप सर्वात अडचणीत येण्याची शक्यता आहे.
भगव्या लाटेचा तडाखा
राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांचे खासदार पुत्र नीलेश यांच्या विरोधात रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीतर्फे विनायक राऊत यांनी दणदणीत विजय मिळवला.
मोदी लाटेचा प्रभाव इथेही दिसून आला असला तरी गेली पाच वष्रे राणे पिता-पुत्रांनी इथे चालवलेला मनमानी कारभार आणि सहकारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेत्यांशी केलेलं वजाबाकीचं राजकारण जास्त हानीकारक ठरलं.
या मतदारसंघातील विधानसभेच्या सहा जागांपैकी चिपळूण, राजापूर व कणकवली महायुतीकडे, तर रत्नागिरी आणि सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. खुद्द राणे कुडाळ मतदारसंघातून निवडून आले आहेत. पण आघाडीमध्ये सध्या असलेला बेबनाव कायम राहिला तर १९९५ प्रमाणे पुन्हा एकवार या मतदारसंघात भगव्या लाटेचा तडाखा बसणं अटळ आहे.