परभणी तालुक्यास जायकवाडी डाव्या कालव्यातून पाणी द्यावे. परळी औष्णिक केंद्राला पाणी सोडण्यापेक्षा पाण्याची गरज असणाऱ्यांना आधी पाणी द्या, उजळअंबा औद्योगिक वसाहतीचे जाहीर प्रकटन रद्द करून नव्याने फेरफार सुरू करा आदी मागण्यांसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
जायकवाडी डाव्या कालव्यातून १६० किलोमीटपर्यंत, म्हणजे मानवत तालुक्यातील किन्होळा गावापर्यंत पाणी आले. तथापि हे पाणी पुढे परभणी तालुक्यास मिळण्याऐवजी परळी औष्णिक केंद्रासाठी जात आहे. पुढील वर्षी १८ मेपर्यंत हे पाणी सुरूच राहणार आहे. परभणी तालुक्यातील गावे तहानलेली असताना परळीकडे पाणी वळविण्याचा निर्णय या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. अशा स्थितीत परभणी तालुक्यास जायकवाडीचे पाणी द्यावे. उजळअंबा औद्योगिक वसाहतीचे जाहीर प्रकटन रद्द करून फेरफार सुरू करावा. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा भूमी अधिग्रहण कायदा रद्द करावा आदी मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात कीर्तिकुमार बुरांडे, अंजली बाबर, िलबाजी कचरे, शेख महेबूब, भीमराव मोगले, सखाराम धोतरे, प्रभाकर जांभळे आदींसह शेतकरी सहभागी झाले. मोर्चात शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा देत असंतोष व्यक्त केला. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.