24 January 2019

News Flash

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर

सरकारने पंचनामे करुन गारपीटग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी

मंगळवारी दुपारी शेतकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी नागपूर – अमरावती मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सरकारने पंचनामे करुन गारपीटग्रस्तांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनात आमदार आशीष देशमुखही सहभागी झाले होते.

वर्धा जिल्ह्याला सोमवारी गारपिटीचा फटका बसला. मंगळवारी कारंजा (घाडगे) तालुक्यात हेटीकुंडी फाट्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत आक्रोश व्यक्त केला. शेतकऱ्यांनी महामार्गावर संत्रा फेकून नाराजी व्यक्त केली. कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी,आगरगाव, सावली येथील  शेतकऱ्यांचे गारपिटीत नुकसान झाले. गहू ,हरभरा ,बागायती टोमॅटो,वांगे, संत्रा या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. मंगळवारी दुपारी शेतकऱ्यांच्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. सकाळी भाजपा आमदार आशीष देशमुख यांनी नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. संतप्त शेतकऱ्यांनी टायर जाळून सरकारचा निषेध केला.

दरम्यान, हाताशी आलेले पीक रविवारी व सोमवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने हिरावून नेल्यामुळे विदर्भातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सुमारे दोन ते तीन लाख हेक्टरवरील पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या गहू, हरभरा, तूर आणि फळबागांना अधिक फटका बसला आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा,बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे. अकोला, वाशिम, अमरावती या चार जिल्ह्य़ांमध्ये पीक हानी अधिक आहे. यवतमाळ, वर्धा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्य़ात गारपिटीचे प्रमाण कमी असले तरी अवकाळी पाऊस पिकांसाठी बाधित ठरल्याने त्याची प्रत खराब होऊन दर कमी होण्याची शक्यता आहे. बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे.

First Published on February 13, 2018 6:25 pm

Web Title: farmers rasta roko on nagpur amravati highway mla ashish deshmukh