News Flash

चाफा बाजारात पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ

मोठी मागणी असलेले हे नाजूक फूल लवकरात लवकर बाजारात पोहोचले तरच या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

नीरज राऊत

नाशवंत फुलाला चांगला भाव मिळण्यासाठी धडपड

झाडावरून खुडल्यानंतर केवळ दीड ते दोन दिवसांचे आयुष्य लाभलेल्या चाफा फुलांना लवकरात लवकर बाजारात पोहोचवण्यासाठी पालघर जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. पहाटे लवकर उठून झाडांवरून ही फुले खुडावी लागत असून ती लवकर खराब होऊ नये आणि त्याचा सुगंध कायम राहावा यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मोठी मागणी असलेले हे नाजूक फूल लवकरात लवकर बाजारात पोहोचले तरच या फुलांना चांगला बाजारभाव मिळतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

सोनचाफा (चंपाका) या मोहक सुगंधी फुलांचा बहरण्याचा हंगाम सुरू झाला आहे. मुंबईतील दादर येथील फुलांच्या बाजारपेठेत पालघर जिल्ह्य़ातील वसई, सफाळे, केळवे, वाणगाव या परिसरातील चाफ्याची फुले येतात. फुलांची आवक एप्रिल व मे महिन्यांत वाढत असल्याने सकाळी लवकर दाखल होणाऱ्या ताज्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत आहे. आपल्या बागेतील फुले लवकरात लवकर दादपर्यंत पोहोचवण्यासाठी पालघर तालुक्यातील बागायतदार धडपड करताना दिसत आहेत.

या फुलाची कोवळी कळी काढल्यानंतर ते चांगले फुलत नाही. हे सुगंधी फूल झाडावरच चांगले फुलते. शिवाय या फुलाचे आयुष्यमान इतर फुलांच्या तुलनेत कमी असल्याने या फुलाची खुडणी (वेचणे) अगोदरच्या दिवशी संध्याकाळी करता येत नाही. त्यामुळे चाफ्याची फुले वेचण्यासाठी कामगार सकाळी उजेडण्याच्या वेळेत चाफ्याच्या बागेत हजर होतात. उन्हाची तीव्रता वाढण्यापूर्वी झाडावरील सर्व फुले वेचण्याचे काम पूर्ण करून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवण्याचे काम करावे लागते.

चाफा कलमाची लागवड केल्यानंतर अवघ्या वर्षभरात या झाडावर फुलांचा बहर येऊ  लागतो. मनाला प्रसन्न करणारा हा सुगंध परिसरातील वातावरण मनमोहक करत असल्याने चाफा, सोनचाफा या फुलांना मुंबईच्या बाजारपेठेत विशेष मागणी आहे. सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्यांच्या कार्यकाळात चाफ्याची आवक कमी असल्याने वेळप्रसंगी या फुलाला किरकोळ बाजारात दहा रुपये प्रति नग इतका दर मिळताना दिसतो. मात्र उर्वरित सात ते आठ महिन्यांच्या काळात हे वातावरणाला प्रसन्न करणारे फूल एक ते दोन रुपयांत सहज उपलब्ध होते. दादरच्या घाऊक बाजारात सध्या हे फूल ३० ते ४० रुपये शेकडा इतक्या दराने विकले जात असले तरी मे महिन्याच्या मध्यावर या फुलाची आवक अधिक प्रमाणात होत असल्याने या फुलाचा दर शेकडा १० ते २० रुपये इतके कमी होताना दिसतो.

दोन टप्प्यांमध्ये वाहतूक

सध्या दादर येथे वसईसह पालघर, केळवा रोड, सफाळे, वाणगाव तसेच शहापूर परिसरातून चाफ्याची फुले येत असतात. सकाळी बागेतून खुडलेली चाफ्याची ताजी फुले दादर येथील बाजारपेठेत सकाळी ९.३० ते १० पूर्वी पोहोचली तर शेकडा दहा ते वीस रुपये अधिक दर मिळत असल्याचे केळवा रोड येथील शेतकरी विनय राऊत आणि उषा राऊत यांचे म्हणणे आहे. त्यांच्या साडेतीन एकर चाफा लागवडीचे क्षेत्र बहरण्याच्या हंगामामध्ये दररोज निघणाऱ्या १० ते २० हजार चाफ्याच्या फुलांना दोन टप्प्यांमध्ये मुंबईच्या बाजारपेठेत याच कारणास्तव पाठवण्यात येते, असे राऊत यांनी सांगितले.

पहाटे चाफ्यांची फुले खुडण्याचे काम सुरू करून निघणाऱ्या फुलांपैकी पहिला फुलांचा माल आम्ही वलसाड पॅसेंजरने थेट दादरला पाठवतो. ही फुले सकाळी ९.१५ पर्यंत बाजारात दाखल होत असल्याने या फुलांना चांगला दर मिळतो. नंतर खुडलेली फुले आम्ही ९ वाजताच्या लोकल गाडीने पाठवतो. फुले बाजारात लवकर पोहोचवणे महत्त्वाचे असल्याने याकामी दोन जणांना कामावर ठेवले आहे.

– विनय राऊत, शेतकरी, केळवे रोड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2019 12:40 am

Web Title: farmers scrambling to reach chafha market
Next Stories
1 सलाम : बिबट्याच्या हल्ल्यातून आईनं केली बाळाची सुटका
2 सैन्यातील जवानाच्या आत्महत्येप्रकरणी महिला पत्रकाराला हायकोर्टाचा दिलासा
3 अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी
Just Now!
X