सातबाराच्या उताऱ्याचा वापर करून विविध कर्जसवलती मिळवल्या जातात. मात्र वर्धा जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी सातबाराच्या आधारावर नवनवीन गाडय़ांची खरेदी करण्याचा सपाटा लावल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बाबतीत हाच वर्धा जिल्हा देशात अग्रेसर आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुसरीकडे गाडय़ा खरेदीचा हा सपाटा चक्रावून टाकणारा आहे.
कार खरेदीसाठी विविध बँका तसेच कार कंपन्या व वित्तपुरवठा कंपन्यांनी थैल्या मोकळ्या सोडलेल्या असतात. कारसाठी कर्ज देण्यात सर्वात मोठा वाटा असलेल्या स्टेट बँकेकडे विचारणा केली असता त्यांनी सातबाराच्या उताऱ्याच्या आधारावर कर्जवाटप केले जात नसल्याचे स्पष्ट केले. मारुती कंपनीच्या वितरकाने दिलेल्या माहितीनुसार २००९ ते २०१४ या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांनी २४०० गाडय़ांची विक्री केली. त्यापैकी ४७० कार सातबाराच्या हमीवर म्हणजेच शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याचे नमूद करणाऱ्यांनी घेतल्या. सातबाराचा उतारा असल्याने त्यांच्या उत्पन्नाचे अन्य स्रोत विचारले जात नसल्याचे या वितरकाने सांगितले. मारुतीव्यतिरिक्त जिल्ह्य़ात आणखीही दोन कार कंपन्यांचे वितरक आहेत. त्यांच्याकडे आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र, ग्रामीण भागात विकलेल्या0 गाडय़ांची संख्या इतरांच्या तुलनेत चांगली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात नोंदणी झालेल्या ८४ कारपैकी १८ कारमालक लहान गावांतील आहेत. याचाच अर्थ तीनही कार वितरकांची माहिती व आरटीओ यांच्याकडील आकडेवारी पाच वर्षांत २४०० कारची विक्री ग्रामीण भागात दाखवते. त्यापैकी किमान एक हजार कारमालक सातबाराधारक असल्याचे स्पष्ट होत आहे. म्हणजेच दर दीड दिवसात एक कार शेतकरी कुटुंबात विकली जात असल्याचे दिसून येते.

शेती करून नव्हे; शेती विकून मोठा झालो
इंडिका व्हिस्टा कारचे मालक, शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणाले, ‘मी शेती करून नव्हे, तर शेती विकून कार व घरमालक झालो. जावंधियांकडे तीन पिढय़ांआधी १४०० एकर शेती होती. सावकारी व्यवसायातूनच ती जुळली, पण हा व्यवसाय बंद केल्यानंतर शेती उत्पन्न काढले नाही, तर ती विकली. सध्या ५० एकर शेती आहे. एकरी २० हजार ते दीड लाख रुपये भाव मिळत गेला.’