शेतकरी संघटनेच्या आंदोलनास प्रारंभ

प्रशांत देशमुख, वर्धा</strong>

केंद्र शासनाचे बंदीचे आदेश झुगारून देत शेतकरी संघटनेने आज जैविक बियाणे वाणांची लागवड करीत आंदोलनास प्रारंभ केला.

केंद्र शासनाने पर्यावरण कायद्यांतर्गत एचटीबीटी बियाणे वापरण्यावर बंदी घातली आहे. मात्र, संघटनेने आमच्या शेतात काय लावायचे हा आमचा अधिकार असल्याचे स्पष्ट करीत केंद्राचे निर्देश धुडकावून लावले. हिंगणघाट तालुक्यातील संघटना नेते मधुसूदन हरणे यांच्या शेतात प्रतिबंधित बियाण्यांचे वाण लावण्यात आले. यावेळी एक हजारांवर शेतकरी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना संघटनेचे मुख्य प्रवक्ते ललित बहाळे म्हणाले की, माझ्या शेतात मी माझ्या इच्छेनुसारच लागवड करणार. विदर्भ- मराठवाडय़ातील बहुतांश शेतकरी एचटीबीटी वाण आपल्या शेतात लावत आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर शेतमालासाठी विदेशी शेतकऱ्यांसोबत स्पर्धा करावी लागते. शेतीत नवे जैविक तंत्रज्ञानाने विकसित बियाणे लावल्यास उत्पादन वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचा फोयदा भारतीय शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे. आजपासून शेतकरी तंत्रज्ञान स्वातंत्र्य सत्याग्रह आंदोलन सुरू झाले असून सर्व शेतकरी त्यात सहभागी होतील, अशी अपेक्षा लव्हाळे यांनी व्यक्त केली.

संघटना नेते वामनराव चटप म्हणाले की, एचटीबीटी वाण लावल्याने शेतीचा खर्च कमी होतो. या तंत्रज्ञानामुळे कापूस पिकांद्वारे खताचा पोषक वापर होतो. मातीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी, तणनाशकांवर नियंत्रण ठेवण्यास व पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगली मदत होते. लहान शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कृषीपूरक रोजगार संधी उपलब्ध होतात. तण उपद्रव कमी झाल्याने वीस टक्क्याहून अधिक जास्त उत्पन्न होते. त्यामुळे हे बियाणे आम्ही लावणारच, असा निर्धार व्यक्त करीत चटप यांनी ही आरपारची लढाई असल्याची घोषणा केली.

यावेळी सरोज काशीकर, राम नेवले, सतीश दाणी, मधुकर झोटिंग, वणा बँकेचे अध्यक्ष डॉ. निर्मेश कोठारी यांनीही मार्गदर्शन केले.