शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या सुकाणू समितीमध्येच फूट पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एका दिशेने चाललेले शेतकऱ्यांचे आंदोलन पुन्हा भरकटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समितीमध्ये २१ जणांचा समावेश आहे. सुकाणू समितीमध्ये आज (शनिवार) अंतर्गत चर्चा होणार आहे. सरकारच्या उच्चाधिकार मंत्रिगटाने सुकाणू समितीला चर्चेसाठी बोलावले आहे. परंतु, सुकाणू समितीत राजकीय थिल्लरपणा सुरू असल्याची टीका करत समितीतील सदस्य शेती अर्थतज्ज्ञ गिरधर पाटील यांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. समितीने आम्हाला अंधारात ठेऊन निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी आपले प्रश्न सुटावेत यासाठी मोठ्या विश्वासाने ही समिती स्थापन केली आहे. पण येथे राजकीय कल्लोळ सुरू असल्याचा आरोप करत आपल्याला या पापात सहभागी व्हायचे नसल्याचे पाटील यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, समितीचे निमंत्रक राजू देसले आणि समिती सदस्य शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी मात्र गिरधर पाटील यांचे आरोप फेटाळले आहेत.

समितीतील सर्व लोक चर्चेला तयार असून चर्चा करण्यात गैर काहीही नसल्याचे रघुनाथ पाटील यांनी म्हटले तर देसले यांनी सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाणार असल्याचे सांगत हे सामुदायिक नेतृत्व असल्याचे म्हटले.

गिरधर पाटील यांनी सरकारबरोबर बोलण्याची ही वेळ नसल्याचे म्हटले. जोपर्यंत शेतकऱ्यांवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात येत नाही. तोपर्यंत सरकारशी चर्चा करायचे नाही, असं ठरलं होतं. पण नंतर हे बोलायला कसे तयार झाले, असा सवाल त्यांनी केला. बैठकीत सामूहिक निर्णय प्रक्रिया होत नाही. राजू शेट्टी हे सत्तेत सहभागी आहेत. आणि सरकारच्या निर्णयावर विरोधही करतात. नाशिक बैठकीवेळी अनेकांना हे पटलेले नाही. कोणाचेही नाव न घेता त्यांनी यामागे काही राजकीय लोकांचा स्वार्थ असल्याचा आरोप त्यांनी केला.

डॉ. बुधाजी मुळीक, अनिल घनवट, रामचंद्र पाटील व आपण सुकाणू समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. तर बुधाजी मुळीक यांनी आपल्याला बैठकीचे निमंत्रणच नसल्याचे सांगितले.

दरम्यान, रघुनाथ पाटील म्हणाले, बैठकीसाठी सर्व लोक तयार आहेत. चर्चा करण्यात काहीच गैर नाही. ज्यांना आंदोलनात फूट पाडायची आहे. तेच असे करत असल्याचा आरोप त्यांनी केला. गिरधर पाटील हे इतरांपेक्षा स्वत:ला वेगळे समजत असतील तर काय बोलणार. कोणी आले नाही म्हणून बैठक थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी आत्महत्येच्या कड्यावर बसला आहे आणि ज्यांचा शेतीशी काही संबंध नाही, ते फूट पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला.