शेतकरी प्रश्नावरून सुरु झालेला लढा दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. शेतकरी प्रश्नासाठी बीडमध्ये महिलांनी मुंडन करुन सरकारचा निषेध नोंदवला. शिवसेना महिला आघाडीने संपूर्ण शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार विरोधात मुंडन आंदोलन केले. मुंडन केल्यानंतर केस मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती आंदोलकांनी यावेळी दिली. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, सरकार शेतकरी प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देत नाही. सरकारने तातडीने शेतकरी कर्जमाफी करावी, तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘भाजप सरकारच करायचं काय, खाली मुंडके वर पाय’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी प्रश्नावर सरकारला जागे करण्यासाठी शिवसेनेने  मुंडन आंदोलन केले. ज्या महिलांच मुंडन करण्यात आलं. त्यांनी पांढऱ्या साड्या नेसलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी डोक्यावचे केस वस्ताऱ्याने काढून टाकले. मुंडन केलेल्या महिलांचे  केस मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितले. आंदोलनकर्तांनी केसांचा बॉक्स जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला असून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हा बॉक्स मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

कर्जमाफीसंदर्भातील मुद्यावर मंगळवारी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ऑक्टोंबरपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असे, त्यांनी म्हटले होते. यावेळी त्यांनी  ही कर्जमाफी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असेल, असा विश्वासही व्यक्त केला. फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर शेतकरी संपासंदर्भातील भूमिका बदलतील का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी अद्यापही आपली भूमिका ठाम ठेवल्याचे दिसते. कर्जमाफीवर ठोस आणि लवकरात लवकर निर्णय घेतला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात शेतकरी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. बीडमधील शिवसेना आंदोलक महिलांनी सरकारने कर्जमाफीची घोषणा करेपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.