शेतकरी संपावर गेला तर ? हा विषय काल परवापर्यंत शालेय अभ्यासक्रमातील काल्पनिक निबंधाचा विषय होता. ज्या विषयावर प्राथमिक स्तरावरची मुलं विचार करत होती. त्या विषयावर आज मुख्यमंत्र्यांसह भाजपचं मंत्रिमंडळ अभ्यास करत आहे. ज्या शेतकरी नेत्यांनी या संपाची घोषणा केली, त्यांनाही संपला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असे वाटले नसेल. पण, शेतकरी ऐतिहासिक संपावर गेला. त्यांनी संपाचा इशारा दिल्यानंतर झोपेत असलेलं सरकार खडबडून जागे झाले. शेतकरी संप एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला कसा ? हा प्रश्न सरकारलाही पडला आहे.
या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकरी संघटना आणि त्यांचं अस्तित्व हे सगळ्यांना माहिती आहे. आजपर्यंत या संघटनांची अनेक आंदोलने बासनात गुंडाळलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या इशाऱ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारशी दखल घेण्याची तसदी ही घेतली नव्हती. मात्र, खेड्यांपाड्यापासून ते मेट्रो सिटीमध्ये राहणाऱ्या खेड्यातील प्रत्येक माणसाच्या मनातील भावनांना या संपाने वाट करुन दिली. त्याच वाटेने भाजप सरकार विरोधात अनपेक्षितपणे शेतकरी रस्त्यावर आला.

केंद्रात ‘मोदी सरकार’ आणि राज्यात ‘फडणवीस सरकार’ म्हणून ओळखलं जातं. निवडणुकांमध्ये प्रचाराच तंत्र ‘सोशल’ करून त्यांनी विरोधकांची प्रतिमा मलिन करत स्वतःची इमेज बिल्ड केली. त्यामुळे सरकार मोठ्या बहुमतात सत्तेवर आलं. मोदी सरकारच्या सोशल मीडियाचा फॉर्म्युला विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी वापरला. आज प्रत्येक पक्षाच्या स्वतंत्र ‘सोशल आर्मी’ काम करत आहेत. ‘संघर्ष यात्रा’, ‘शिवसंपर्क अभियान’, किंवा ‘सरकारची शिवार संवाद यात्रा’ या जनतेपर्यंत पोहोचवण्याच काम ‘पेड सोशल आर्मी’ करत होती. राजकीय पक्षांकडे यंत्रणा आणि पैसा असल्यामुळे त्यांची आंदोलन चर्चेत आली. त्यामुळे शेतकरी संपाचं काहीही होणार नाही, असं प्राथमिक मत होतं. मात्र, ज्या सोशल मीडियाचा वापर करून मोदी सरकार सत्तेवर आलं. त्याचाच वापर करून गाव तांड्यावर शेतात राबत असलेल्या आपल्या बापाच्या वेदना शेतकरी पुत्रांनी सोशल मीडियातून मांडल्या. त्यामुळे राज्यभर शेतकरी संप व्यापला गेला. संपात शेतकरी संघटना, राजकीय पक्ष यांच्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलांचा सक्रिय सहभाग जास्त आहे. श्रेयवाद आणि राजकारण बाजूला ठेवून शेतकरी बापाच्या वेदना सेकंदा सेकंदाला सोशल मीडियावर वक्त केल्या जात होत्या.

आंदोलन अधिक व्यापक होत असताना. दूध, भाजीपाला याचा रस्त्यावर खच पाहिल्यानंतर कवडीमोल भावाने भाजीपाला विकत घेणाऱ्यांची मनं हळहळली. संपाला पाठिंबा, पण अन्नाची नासाडी नको, असा सूर उमटायला सुरुवात झाली. टोमॅटोला भाव न मिळाल्यामुळे बाजारात झालेला लाल चिखल. कांद्याचा दर कोसळल्याने डोळ्यात आलेलं पाणी. ‘पांढर सोनं’ पिकवून फाटके कपडे घालत असलेला शेतकरी बाप. आणि अलीकडे तुरीमुळे ‘चिंता’तुर झालेला शेतकरी. सगळ्या जवळून अनुभवलेल्या वेदना शेतकऱ्यांच्या मुलांनी पोटतिडकीने मांडल्या. सरकारने रोष वाढत चालल्याचे पाहून संप मोडीत काढण्यासाठी शेतकरी नेते म्हणून मिरवणाऱ्या काहींना गळाला घातलं. नेत्यांनी तलवारी म्यान केल्या. मात्र, शेतकऱ्यांची सोशल आर्मी लढत आहे. याची धडकी सरकारलाही बसली. त्यामुळे संप काळात नाशिकमधील इंटरनेट सेवा बंद करण्याचा रडीचा डाव खेळला गेला. मग नाशिक बटालियनच्या मदतीला राज्यातील इतर तुकड्या धावून आल्याने कूटनीतीचा हा डावही हाणून पाडला. रस्त्यावर उतरलेला शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी लढणारी ‘सोशल आर्मी’ यामुळे शेतकरी संपाची वाटचाल सुरु आहे.