दीर्घकाळ दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्य़ात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  मान्सूनच्या पावसाचे सुमारे एक महिन्यापूर्वी झालेले आगमन जेमतेम दोन दिवस टिकले. त्यानंतरचे बहुतेक दिवस कोरडेच गेले. त्यापैकी अनेक दिवस कडकडीत ऊनही पडले. त्यामुळे चांगली उगवण झालेली भाताची रोपे करपू लागली. नदी, नाले किंवा विहीर असलेल्या शेतकऱ्यांनी पंपाच्या साहाय्याने पाणी उचलून शेती जगवली, तसेच लावण्याही केल्या. पण हे प्रमाण अतिशय नगण्य राहिले. रत्नागिरी जिल्ह्य़ातील एकूण भातशेतीपैकी जेमतेम पाच टक्के लावणी आजपर्यंत पूर्ण झाली आहे. मात्र सोमवारपासून जिल्ह्य़ात सर्वत्र पुनर्वसू नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाचे दमदार पुनरागमन झाले. त्यामुळे पावसाची पहिली दोन नक्षत्रे कोरडी गेल्यामुळे चिंताक्रांत झालेल्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले व त्यापाठोपाठ पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. त्यामुळे भात खाचरांमध्ये चिखलणीसाठी भरपूर पाणी साठू लागले आहे.  गेल्या २४ तासात जिल्ह्य़ातील नऊ तालुक्यांपैकी संगमेश्वर तालुक्यात सर्वात जास्त पावसाची (९०.३ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल रत्नागिरी (८६.८ मिमी), गुहागर (७३ मिमी), दापोली (५० मिमी), चिपळूण (३८.२ मिमी), खेड (२६.४ मिमी) आणि लांजा (२४ मिमी) या तालुक्यांमध्येही चांगल्या पावसाची नोंद झाली. त्यामानाने मंडणगड (१६ मिमी) आणि राजापूर (१२ मिमी) या तालुक्यांमध्ये फारसा पाऊस पडला नाही. या कालावधीत जिल्ह्य़ात एकूण सरासरी ४६.२ मिलिमीटर पाऊस पडला असून यंदाच्या मोसमातील हा उच्चांक आहे. तसेच गेल्या १ जूनपासून आजअखेर जिल्ह्य़ात एकूण सरासरी ४१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत, याच्या सुमारे चौपट, तब्बल १७८२.२ पाऊस बरसला होता.
दरम्यान कोकणात सर्वत्र पावसाच्या पुनरागमनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून आणखी काही दिवस ते टिकून राहील, असा अंदाज आहे. तसे झाल्यास जिल्ह्य़ात सर्वत्र लावणीच्या कामाला वेग येईल, अशी अपेक्षा आहे.