ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी नगर जिल्ह्यातील पैठण, शेवगाव, आणि नेवासा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदोलन चिघळले आहे. पैठणपासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापुर येथे बुधवारी शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन सुरू होते. काही वेळातच आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांनी सुरूवातीला त्यांच्यावर लाठीमार केला. मात्र, तरीही आंदोलक माघार घेत नसल्याने पोलिसांनी या ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबार केल्याचे समजते. मात्र पोलिसांनी गोळीबार केल्याचे वृत्त नाकारले आहे.

त्यानंतर झालेल्या धावपळीत काही शेतकरी जखमी झाल्याचे समजत आहे. उद्धव मापारे आणि बाबुराव दुकळे हे दोन शेतकरी गंभीर जखमी असून, त्यांच्यावर शेवगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऊसाला ३ हजार १०० रुपये दर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. राज्य संघटनेचे शेतकरी रस्त्यावर उतरले होते. बुधवारी पोलिसांनी प्रकाश बाळवडकर, अमरसिंह कदम, शेवगावचे दादासाहेब टाकळकर, संदीप मोटकर, शुभम सोनावळे, दत्तात्रय फुंदे, संतोष गायकवाड, बाळासाहेब फटांगरे यांच्यासह दहा ते १५ शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी पैठण-शेवगाव रोडवर घोटण, खानापूर, क-हेटाकळी, एरंडगाव, कुडगाव आदी गावांमध्ये रास्ता रोको केला. रस्त्यावर टायर जाळले, रस्त्यावर लागडे आणून जाळली. पोलिसांकडून लाठीमार सुरू होताच आंदोलकांनी मिळेल त्या रस्त्याने पळ काढला. याठिकाणी राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून, शेवगाव तालुक्यात वातावरण तणावपूर्ण आहे.