पहिल्या हप्त्याबाबत कारखानदारांचे मौन; यंत्रणांकडून नुसतीच चर्चा; दराचा विषयच येत नसल्याचे शेतकऱ्यांचा संताप

जायकवाडीच्या फुगवटय़ावर  शेवगाव ते पठण या पट्टय़ातील उसावर थोडेथोडके नाही तर २० ते २५ कारखाने चालतात. उसाची टंचाई असली की, पळवापळवी, जादा दर अन् सुकाळ असला की, कमी दर, काटामारी चालते. चालू गळीत हंगामाला सुरुवात होऊन पंधरा दिवसांपूर्वी तोडणी सुरू झाली. तरी पहिल्या हप्ता किती देणार याचे नाव घेईना. त्यातून तयार झालेल्या असंतोषाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फुंकर घातली. प्रशासनालाही खासगी व सहकारी साखर कारखानदार जुमानायलाच तयार नव्हते. त्यातच पोलिसांनी दडपशाही सुरू केल्याने आंदोलनाला िहसक वळण मिळून प्रकरण गोळीबारापर्यंत गेले.

यंदा बहुतेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊस जास्त आहे. तरीदेखील 2गाळप पूर्ण क्षमतेने करण्याकरिता जायकवाडीच्या शेवगाव (जि. नगर) व पठण (जि. औरंगाबाद) या पट्टय़ातील तळणी, घोटण, अंतरवली, खानापूर, कर्हेटाकळी, सोनवाडी, तेलवाडी, चनकवाडी, पाटेगाव या गावांमध्ये संत एकनाथ, केदारेश्वर, वृद्धेश्वर, ज्ञानेश्वर, मुळा, गंगामाई, शरद, कोपरगाव, संजीवनी, अगस्ती, प्रसाद, विखे, संगमनेर आदी सुमारे २० कारखाने उसासाठी गेले. ऊसतोडी सुरू झाल्या. कोल्हापूर भागात तर ऊस सुरूच झाला होता. पण नगर, औरंगाबाद, बीड जिल्ह्य़ातील कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याना भावाचे आश्वासन दिले. मात्र या पट्टय़ातील बिगर सभासदांना किती भाव देणार हे सांगितलेच नाही. दोन हजार ४० ते दोन हजार १०० प्रतिटनाप्रमाणे काटापट्टी भाव देऊ पण पुढे काय करणार हे सांगितले नाही. त्यामुळेच सुमारे २५ किलोमीटरच्या या पट्टय़ात खदखद होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्याला फुंकर घातली. संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर, अमरसिंह कदम (बारामती), मयूर बोरडे (जालना) यांच्यासह सात ते आठ प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या भागात सभा घेऊन रान पेटविले. आठ दिवसांपासून आंदोलन सुरू होते. पाटेगाव (ता. पठण) येथे शेतकरी जमा होत, पण त्यांच्याशी बोलणी कोणी करीत नव्हते. दोन्ही तालुक्यांतील शेतकरी तेथे जमत. नंतर चार दिवसांपासून त्यांनी केवळ उसाच्या मोटारी आडवायला सुरुवात केली. तेव्हा कुठे प्रशासनाला जाग आली. पठणच्या तहसीलदारांनी औरंगाबाद व नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. औरंगाबाद येथील प्रादेशिक साखर सहसंचालकांनी बठक घेतली. पण साखर सम्राटांनी दखल न घेता अधिकाऱ्यांना पाठवून दिले. सहसंचालकांनाही जुमानले नाही. मातब्बर राजकारण्यांपुढे साखर आयुक्तालयाचेही नेहमीप्रमाणे काही चालले नाही. त्यामुळे असंतोषाचा उद्रेक झाला.

पठण-शेवगाव या १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर घोटन व पाटेगाव येथे काल अडविण्यात आला. हजारो शेतकरी एकही वाहन जाऊन द्यायला तयार नव्हते. विशेष म्हणजे महिलाही त्यात उतरल्या. सुमारे २४ तास वाहतूक ठप्प करण्यात आली. दोन विभागातल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नव्हता. बुधवारी सकाळी नगर व औरंगाबाद पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. मंगळवारी रात्री नऊ व बुधवारी पहाटे १३ प्रमुख कार्यकर्त्यांना अटक केली.

सकाळी हे समजल्यानंतर लोक संतप्त झाले. त्यातून पाटेगावला पोलिसांनी लाठीमार केला. लोकांना पांगविले. त्यानंतर घोटनला पुन्हा लाठीमार केला. खानापूर येथे पाच ते सात हजार लोक जमा झाले होते. राज्यराखीव पोलीस दल व पोलिसांनी खानापूरला येऊन पुन्हा लाठीमार करून लोकांना पांगविले. गल्लीतून पळणाऱ्या तरुणांना बेदम चोप दिला जात होता. त्याला महिलांनी विरोधी केला. पण त्यांनाही पोलिसांनी सोडले नाही.

अखेर लोकांनी प्रतिकार करीत पोलिसांवर दगडफेक केली, पोलिसांनी आधी आश्रुधूर सोडला, नंतर रबरी गोळ्या मारल्या तरीदेखील जमाव ऐकत नसल्याने त्यांनी गोळीबार केला. त्यात उद्धव विक्रम मापारी (वय २९), नारायण भानुदास डुकळे (वय ३५, दोघे राहणार तेलवाडी, ता. पठण) हे जखमी झाले. त्यानंतर आक्रमक जमावाला घाबरून पोलीस पळून गेले. जमावाने बसगाडी पेटविली. रस्त्यावर ठिकठिकाणी टायर पेटविले.

या आंदोलनाचे पडसाद शेवगावलाही उमटले. शहर बंद करून लोकांनी रास्तारोको सुरू केला. अप्पर पोलीस अधिक्षकांच्या गाडीची तरुणांनी मोडतोड करण्याचा प्रयत्न केला. पण सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तरुणांना आवरले.

अखेर प्रशासनाला जाग आली. तेव्हा कुठे ऊस भावाच्या बोलणीची बठक सुरू झाली. साखर कारखानदारांना शरम वाटल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकारी पाठविले. आंदोलन चिरडण्याची कारवाई चांगलीच महागात पडली.

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे लक्ष्य

विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे यांचे सासरे उद्योजक पद्माकर मुळे यांचा गंगामाई साखर कारखाना शेवगाव तालुक्यात घोटननजीक आहे. पूर्वी तो कन्नड तालुक्यात घाटनांद्रा येथे होता. तो तेथून या भागात आणला. या कारखान्याकडे ऊसच शेतकऱ्यांनी जाऊ दिला नव्हता. पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून नांगरे यांनी आंदोलन चिरडले असा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. कम्युनिस्ट पक्षाचे सुभाष लांडे यांच्यासह आज सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी तसा आरोप केला.

खासदार शेट्टी यांचा सबुरीचा सल्ला

खासदार राजू शेट्टी यांनी आज शेवगावला पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पाठविले. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे यांच्यासह अनेकांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आंदोलनात िहसा होऊ देऊ नका, असा सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे आता तुपकर यांनी चच्रेला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे कारखान्याचे सभासद व बिगर सभासद यांना दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या दर पद्धतींवर प्रकाश पडला आहे. गेली तीन वष्रे या भागाला चांगले दर मिळाले. पण चालू वर्षांपासून ऊस वाढणार असल्याने त्यांना कारखाना मिळणे कठीण होणार आहे. त्यातूनच आंदोलनाची धग वाढली.

साखर कारखानदारांचा अंदाज चुकला

राज्याच्या एका कोपऱ्यात कोल्हापूर, सांगली भागात आंदोलनाला प्रतिसाद मिळतो. नगर, औरंगाबादला मिळत नाही असा साखर आयुक्त कार्यालय, महसूल विभाग व पोलीस अधिकाऱ्यांसह साखर कारखानदारांना वाटत होते. पण आता या भागातही लोक पेटून उठल्याने सर्वानाच धक्का बसला. आजही शेतकऱ्यांना न जुमानता मग्रुरीत राहणाऱ्या कारखानादारांना हा एक जोराचा हादरा बसला आहे.