14 December 2019

News Flash

केंद्रीय पथक येण्यापूर्वीच शेतकऱ्याची आत्महत्या

माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

 

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक शनिवारी जिल्ह्यत येत आहे. दोन अधिकाऱ्यांचे पथक दिवसभरामध्ये ३७१ किलोमीटरचा प्रवास करून १३ गावांना भेटी देणार आहे. पथक जिल्ह्यत दाखल होण्यापूर्वीच शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी येथील शेतकरी नारायण आप्पाराव सोळंके (वय ६५) यांनी कपाशीच्या उभ्या पिकात बाभळीच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अतिवृष्टीमुळे आलेले नराश्य आणि कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.

नारायण सोळंके हे २१ नोव्हेंबर रोजी शेतात कामासाठी गेले ते परतले नाहीत. म्हणून शुक्रवारी शोध घेतला असता त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत नारायण सोळंके यांची दहा एकर बागायती जमीन आहे. अतिवृष्टीमुळे कपाशीसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यातच खासगी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकेचेही कर्ज असल्याने ते कसे फेडायचे, या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. शेतकरी आत्महत्येची मालिका जिल्ह्यत सुरूच असून गेल्या आठवडय़ात चौघांनी मृत्यूला कवटाळले होते. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे आíथक कोंडीत सापडलेला शेतकरी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलू लागला आहे.

पथकाची आज १३ गावांना भेट

केंद्रीय पथक प्रमुख व्ही. थिरुप्पूगज व डॉ. के. मनोहरन हे दोन अधिकारी गेवराई तालुक्यातील धोंडराई, बागिपपळगाव, गेवराई, मुदापुरी, वाहेगाव आम्ला, शृंगारवाडी, माजलगाव, नित्रुड (ता. माजलगाव), तेलगाव (ता. धारुर), पुसरा, वडवणी, मोरवड (ता. वडवणी), घाटसावळी (ता. बीड) या १३ गावांना भेटी देणार आहेत. पथक सोयाबीन, बाजरी, कापूस या पिकांची पाहणी करणार असून शनिवारी सायंकाळी बीड येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यतील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

कांद्यावर ट्रॅक्टर फिरवला

परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षांवरही पाणी फिरले. लाखो रुपये खर्च करून कांद्याचे पीक घेतले. मात्र हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याने कांदा उत्पादक आíथक संकटात सापडले आहेत. कांद्याचे भाव कडाडले असले तरी पावसामुळे कांदे सडल्याने बीड तालुक्यातील अंधापुरी येथील बबनराव टेकाळे या शेतक ऱ्याने कांद्याच्या पिकावर टॅक्टर फिरवला.

First Published on November 23, 2019 2:57 am

Web Title: farmers suicide before the union squad arrives akp 94
Just Now!
X