दिवाळीचे दिवस सुरु असताना झेंडू उत्पादक शेतकऱ्यांवर फुलं रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये रस्त्यावर अक्षरशः फुलांचा खच पडल्याचं दिसून आलं. आता आमच्या मुलांनी दिवाळी कशी साजरी करायची असा उद्विग्न प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे. राज्यभरात अवकाळी पाऊस पडल्याने फुलशेतीला त्याचा मोठा फटका बसला आहे. झाडांवर आलेली फुलं बाजारात येईपर्यंत खराब होऊ लागली आहेत त्यामुळे झेंडूच्या फुलांना किलोमागे अवघा पाच रुपयांचा भाव मिळतो आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आज झेंडूची फुलं रस्त्यावर फेकली.
नाशिकहून फुलं कल्याणमध्ये विक्रीला आणण्यासाठी एका किलोमागे ७ रुपयांचा खर्च आहे. आम्हाला २०० ते ३०० रुपयेही मिळणार नसतील तर आम्ही दिवाळी साजरी कशी करायची असा सवाल झेंडू उत्पादकांनी केला आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर फुलं फेकून दिली आणि परतीची वाट धरली. अनेक शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या भावाने फुलांची विक्री करत असल्याचंही चित्र कल्याणमध्ये दिसून आलं. सरकारने आम्हाला अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशीही मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2019 11:29 am