इंडियाबुल्सच्या रेल्वेमार्गासाठी दावणीला बांधल्या गेलेल्या महसूल यंत्रणेच्या ज्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धमक्या दिल्या, त्यांना निलंबित करावे आणि बळाच्या सहाय्याने सुरू असलेली भूसंपादन प्रक्रिया त्वरित थांबवावी या मागणीसाठी मंगळवारी दुपारी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली
इंडिया बुल्स रिअलटेक कंपनी सिन्नर तालुक्यात २७०० मेगावॉट क्षमतेचा औष्णीक वीज प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पाच्या रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी महसूल विभागाने दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाची तुकडी, अग्निशमन विभाग, महिला कर्मचाऱ्यांसह २०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा घेत मोजणीचे काम सुरू केले.
 स्थानिकांचा विरोध असताना यंत्रणा बेकायदेशीरपणे भूसंपादन प्रक्रिया राबवून पोलिसांमार्फत शेतकऱ्यांवर अत्याचार करीत असल्याची तक्रार शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रांताधिकारी व तहसीलदारांनी धमक्या दिल्या. यावेळी झालेल्या हल्ल्यात मंदा मंडलिक, मंदा सांगळे या गंभीर जखमी झाल्या. इंडिया बुल्ससाठी करण्यात येणाऱ्या या दडपशाहीच्या निषेधार्थ समितीने निदर्शने केली. डॉ. डी. एल. कराड, श्रीधर देशपांडे, राजू देसले, तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर ठाण मांडले. महसूल व पोलीस यंत्रणेकडून सुरू असलेल्या दडपशाहीची डाव्या पक्षांच्या शिष्टमंडळाने नायगावला भेट देऊन माहिती घेतली होती. शेतकऱ्यांचा विरोध असताना पोलिसी बळाचा वापर करून भूसंपादन करणे हे लोकशाही तत्वाला काळीमा फासणारे असल्याचे समितीने म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून ही प्रक्रिया थांबवावी आणि शेतकऱ्यांना धमक्या देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.